पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहशतवादी संशयित चिनी महिलेला खोट्या आणि अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे. आठ दिवसांत ही चौकशी समिती अहवाल सादर करणार असल्याचे आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरात राहणार्या एका चिनी महिलेला पुणे महापालिकेच्या वानवडी क्षेत्रीय कार्यालयाने विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. संबधित महिला ही दहशतवादी संशयित असून, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवादविरोधी शाखेकडून या महिलेची चौकशी सुरू आहे.
त्यात या महिलेकडे पुणे महापालिकेचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत खोट्या आणि अपूर्ण कागदपत्रे असतानाही महापालिकेने तिला विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले असल्याचे आढळून आले होते. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे महापालिकेला कळविल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. आरोग्य विभागामार्फत विवाह नोंदणीचे काम चालत असल्याने वानवडी क्षेत्रीय आयुक्तांनी याबाबत आरोग्यप्रमुखांना कळविले होते.
त्यानुसार आरोग्यप्रमुख भगवान पवार यांनी सहायक आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांच्यासह आणखी एका अधिकार्यांची चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीकडून हे विवाह नोंदणी प्रमाणपत्र नक्की कोणी आणि कशाच्या आधारे दिले, याची चौकशी करण्यात येत आहे. या समितीचा अहवाल पुढील दोन ते तीन दिवसांतच येईल, असे डॉ. पवार यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा