सीपीआर ड्रेसिंग मटेरियल खरेदीत घोळ | पुढारी

सीपीआर ड्रेसिंग मटेरियल खरेदीत घोळ

डॅनियल काळे

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सर्जिकल मटेरियल खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोळ दिसून येत आहे. गरज नसताना हजारो ड्रेसिंग किटची खरेदी करून ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा आहे. अंतर्गत यंत्रणेची सांगड, राजकीय वरदहस्त यामुळे कोट्यवधी रुपयांचे ड्रेसिंग मटेरियल सध्या स्टोअरमध्ये पडून आहे. गरजेपेक्षा कितीतरी अधिक पटीने या साहित्याची खरेदी झाली असून, वापराविना हे साहित्य काही महिन्यांतच कालबाह्य होण्याची भीती आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची ही खरेदी ठेकेदार कंपनीचे उखळ पांढरे करण्यासाठीच झाल्याची चर्चा आहे.

सीपीआर रुग्णालय एका बाजूला गोरगरीब रुग्णांना जीवनदान देत असतानाच, दुसर्‍या बाजूला लुटारूंचा अड्डा बनला आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची लूट केली जात आहे. बोगस परवाना घेऊन न्यूटन कंपनीने येथे ठेका मिळविल्याच्या प्रकरणाची उशिरा होईना, लांबड लागली आहे. शिवसेनेने आंदोलन करून जनरेटा लावला आहे. राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना शिष्टमंडळाद्वारे भेटून शिवसेनेने तगादा लावला आहे. शिवसेनेचे संजय पवार, विशाल देवकुळे, संजय जाधव यांनी याबाबतची माहिती मिळवून प्रशासनाला कारवाई करायला भाग पाडले. त्यानिमित्ताने न्यूटन कंपनीचे अनेक कारनामे समोर आले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे निविदा भरतानादेखील या कंपनीने घोळ घालत कागदपत्रे सादर करताना तांत्रिक कारणे पुढे करत ऑनलाईन कागदपत्रे सादर करणे टाळले. एरव्ही अशा प्रकरणात कोणाचीही कागदपत्रे बाय हॅण्ड सादर केली जात नाहीत; परंतु या कंपनीची कागदपत्रे बाय हॅण्ड स्वीकारण्यात आली. तेथूनच घोळाला सुरुवात झाली.

केवळ ड्रेसिंग मटेरियलच्या सेटवरच कोट्यवधीचा खर्च झाला आहे. ज्या ड्रेसिंग मटेरियलचा सेट खुल्या बाजारात 100 ते 125 रुपयांना मिळतो, त्याच ड्रेसिंग मटेरियलची खरेदी एक हजार रुपयांप्रमाणे करण्यात आली आहे. खरेदीची लांबड लागल्यानंतरच प्रत्येक विभागाकडून ड्रेसिंग मटेरियलची मागणी करवून घेण्यात आली. कोट्यवधी रुपयांच्या खरेदीची डिमांड करताना प्रत्येक विभागाकडून साध्या कागदावर ही डिमांड नोंदविल्याची माहिती आहे.

सीपीआरमधील एक अंतर्गत यंत्रणाच या लुटारूंच्या टोळीला सामील असल्याने कोट्यवधीच्या खरेदीतून ठेकेदार कंपनीचे उखळच पांढरे झाले आहे. 2021 मध्ये ड्रेसिंग मटेरियलच्या मागणी नोंदविण्यात आली नाही. त्यानंतरच्या दोन वर्षांत मात्र हजारोच्या संख्येने सेट मागविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे मागविलेल्या सेटपैकी केवळ 7 हजार 200 सेटची आवश्यकता लागली असून, प्रत्यक्षात 65 हजारांवर सेट स्टॉकमध्ये आहेत. हे कमी की काय म्हणून पुन्हा नव्याने ड्रेसिंग मटेरियलच्या खरेदीचा घाट घालण्यात आला होता; परंतु या खरेदीची लांबड लागल्याने हा डाव तूर्त उधळला आहे.

Back to top button