पुणे : ‘बालभवन’ची मैदाने पुन्हा फुलली!

कोरोनामुळे बच्चे कंपनी घरातच अडकली होती. मात्र निर्बंध शिथिल होत असल्याने ती आता बालभवनात मैदानावर खेळांचा आनंद घेऊ लागली आहेत.
कोरोनामुळे बच्चे कंपनी घरातच अडकली होती. मात्र निर्बंध शिथिल होत असल्याने ती आता बालभवनात मैदानावर खेळांचा आनंद घेऊ लागली आहेत.

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोणी मैदानी खेळांत रमलेले दिसेल. तर कोणी कराटे शिकण्यात.. कोणी क्रिकेट खेळताना दिसेल, तर कोणी गप्पा-गोष्टींमध्ये रममाण झालेले. कारण मुलांना मुक्तपणे खेळण्याचा, बागडण्याचा आनंद देणारी शहरातील विविध बालभवन पुन्हा सुरू झाली आहेत.

घरात ऑनलाइन वर्गांना वैतागलेली मुले आता बालभवनमध्ये मनमुरादपणे मैदानी खेळ खेळताना दिसत आहेत. मुलांसाठी शहरात अनेक बालभवन आहेत. ज्यामार्फत प्रशिक्षण कार्यशाळांपासून ते माहितीपर उपक्रमांपर्यंत, तसेच मैदानी खेळही घेतले जातात. कोरोनाकाळात सर्व बालभवन बंद होते; पण आता राज्य सरकारच्या परवानगीनंतर बहुतांश बालभवन सुरू झाली आहेत.

महेश बालभवनच्या संचालिका सुरेखा करवा म्हणाल्या, 'जानेवारीत कोरोनारुग्णांची संख्या वाढल्यामुळे आणि सरकारची परवानगी नसल्यामुळे महिनाभर बालभवन बंद होते; पण आता ते पुन्हा सुरू झाले आहे. पालक मुलांना बालभवनमध्ये पाठवू लागले असून, आम्ही सर्व खबरदारी घेऊन मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत आहोत. मुलांचा सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुले बालभवनात येतात, मित्र-मैत्रिणींबरोबर खेळण्याचा आनंद घेतात, हे पाहून आनंद वाटतो.'

'कोरोनाकाळात दोन वर्षे बंद असलेले गरवारे बालभवन एक फेब्रुवारीला सुरू झाले आहे. सायंकाळच्या वेळेत मुले बालभवनात येऊन वेगवेगळ्या मैदानी खेळांचा आनंद घेत आहेत. आम्ही खबरदारीच्या उपाययोजना केल्यामुळे पालकांमध्येही विश्वास रुजत आहे. म्हणूनच पालकच हळूहळू मुलांना बालभवनला पाठवू लागले आहेत. सध्या आठवड्यातील तीन दिवस बालभवन सुरू असून, सहा वर्षांपुढील मुले बालभवनात येत आहेत. व्यायाम, खेळ, गाणी आणि गोष्टी असे वेगवेगळे उपक्रम मुलांसाठी घेत आहोत. मैदान आणि मोकळी हवा हा बालभवनचा आत्मा आहे. मुले पुन्हा येथे येत असल्याचे पाहून आम्हालाही आनंद होत आहे.'
सुवर्णा सखदेव, उपसंचालिका, गरवारे बालभवन

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news