Pune Politics: पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (दि.15) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सासवडला सभा होणार आहे. या मतदारसंघात महायुतीचे विजय शिवतारे, काँग्रेसचे संजय जगताप आणि राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे अशी तिरंगी लढत होत आहे. सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळ मैदानावर होणार्या या सभेत मुख्यमंत्री पुरंदर हवेलीच्या प्रश्नांवर काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकल्यानंतर शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा त्यांचे हुकमी शिलेदार असलेल्या विजय शिवतारे यांच्या बालेकिल्ल्यात सासवडला घेतली होती. शिवतारे यांनी या वेळी पुरंदर उपसाची तिप्पट झालेली पाणीपट्टी, फुरसुंगी, उरुळी पाणीयोजना, हवेलीतील समाविष्ट गावांत होत असलेली बेसुमार टॅक्स आकारणी, फुरसुंगी, उरुळी स्वतंत्र नगरपरिषद आणि जेजुरी विकास आराखडा असे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले.
शिंदे यांनी हे पाचही प्रश्न सोडवून टाकले आहेत. याशिवाय सासवड आणि जेजुरीकरांना ऐन गणेशोत्सवात सुखद धक्का देत त्यांनी मोठ्या पाणीयोजनाही मंजूर केल्या आहेत. दोन्ही शहरांना अनुक्रमे 143 आणि 78 कोटी रुपये मंजूर करीत शिंदे यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध करून दाखवली.
पुरंदर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या गुंजवणी प्रकल्पाच्या जलवाहिनीचे काम विद्यमान आमदारांच्या पाच वर्षांच्या काळात बंद पडले होते. शिवतारे यांनी यासाठी ताकद लावल्यावर शिंदे यांनी मूळ आराखड्याप्रमाणे तेही काम सुरू केले. एकंदरीत स्वभावाने मितभाषी आणि शांत दिसणार्या शिंदे यांच्या कामाचा हा झपाटा पाहून पुरंदर- हवेलीतील सामान्य माणूसही आचंबित झाला आहे.
तरुणांना आयटी पार्कची उत्सुकता
शिवतारे यांनी पुरंदर- हवेलीत आयटी पार्क उभारण्याची संकल्पना आपल्या वचननाम्यात दिली आहे. तालुक्यातील युवावर्गाला याबाबत उत्सुकता असून, शिंदे हे दिलेला शब्द पूर्ण करतात याची खात्री पटल्याने युवकांचे लक्ष आयटी पार्कबाबत काय होणार याकडे लागलेले आहे.