

पिरंगुट(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील भुकूम आणि भूगावला पाणीपुरवठा करणारा छत्रपती शिवाजी महाराज जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. दोन्ही गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यावर्षी अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. तलाव नेहमीपेक्षा उशिराने भरला आहे. दरम्यान, तलावात प्रदूषित पाण्याचे प्रमाण जास्त आहे. राम नदीच प्रदूषित झाल्यामुळे या तलावामध्ये प्रदूषित पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे दिवाळीनंतरच विहिरी आणि कुपनलिका आटण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
जलाशयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचर्याचे साम—ाज्य पसरले आहे. या ठिकाणी नागरिक कचरा टाकत आहेत. त्याचप्रमाणे तलावाच्या भिंतीवरही झाडेझुडपे वाढली असून, छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या तलावाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी भूगाव आणि भुकूममधील ग्रामस्थांनी केली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ओढे- नाले वाहिलेले नाहीत. तलाव उशिरा भरला आहे. दोन्ही गावांना हे पाणी वर्षभर पुरवायचे असल्याने दोन्ही ग्रामपंचायतींनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
हेही वाचा