

भवानीनगर(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सन 2023- 2028 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक यांनी दिला असून, मागील तीन वर्षांपासून लांबलेल्या कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. दि. 21 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने श्री छत्रपती कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक चार आठवड्यांत घेण्याचा आदेश दिला होता, त्यानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचा आदेश कारखान्याला दिला आहे.
कारखान्याच्या संचालकपदासाठी इच्छुक असणार्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलेली आहे. श्री छत्रपती साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 10 मे 2020 रोजी संपली होती. त्या वेळी निवडणूक याद्या सादर करून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, या याद्यांवर हरकती घेऊन उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून कारखान्याची निवडणूक रखडली होती.
21 एप्रिल 2023 रोजी उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. 10 मे 2023 रोजी प्रादेशिक सहसंचालक यांनी छत्रपती कारखान्याने प्राथमिक मतदार याद्या तयार करण्याचा आदेश दिला आहे. या याद्या तयार करताना 1 मे 2023 ची सभासदसंख्या विचारात घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 26 व 27 मध्ये दिनांक 28 मार्च 2022 मध्ये झालेली सुधारणा तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961, महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) 2014 च्या उपविधीतील तरतुदीचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीकडे मागील तीन वर्षांपासून सभासदांचे लक्ष लागले होते.