सासवड : ‘सीरम’मध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक
सासवड : पुढारी वृत्तसेवा : सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कामाला लावतो असे सांगून 28 जणांकडून 41 लाख 15 हजार रुपये घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगेश राजाराम पवार (रा. तुकाईदर्शन, फुरसुंगी) याच्यावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिकेत जगन्नाथ जगताप (रा. ताथेवाडी, ता. पुरंदर) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी अनिकेत जगताप याचा मित्र शैलेश अशोक जगताप याने सीरम कंपनीत मॅनेजरपदावर काम करणारे मंगेश राजाराम पवार यांनी मला पैसे घेऊन सीरम कंपनीमध्ये असिस्टंट एक्झिकेटीव्ह पदावर कामाला लावले असल्याचे सांगितले.
तुलादेखील नोकरीची गरज असल्यास मंगेश पवार याच्यासोबत ओळख करून देण्याचे सांगत त्यानुसार शैलेशने मंगेश याची अनिकेत याच्याशी ओळख करून दिली. पवार याने सीरम कंपनीमध्ये शैलेशप्रमाणेच असिस्टंट एक्झिकेटीव्ह पदावर कायमस्वरुपी नोकरीला लावतो असे सांगत 1 लाख 50 हजार द्यावे लागेल असे सांगितले. त्यानंतर दि. 9 सप्टेंबरला अनिकेत याच्या फोन पे खात्यावरून मंगेश पवार 25 हजार, दि. 15 सप्टेंबर रोजी 20 हजार रुपये, दि. 19 सप्टेंबर रोजी आणखी 50 हजार रुपये अशी रक्कम पाठवली. उर्वरित 55 हजार रुपये रक्कम रोखीने पवार याला हडपसर येथे देण्यात आली.
दरम्यान मंगेश पवार याने अनिकेतप्रमाणेच अनेकांकडून सीरम कंपनीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून
ऑनलाइन व रोख स्वरूपात लाखो रुपये घेतले आहेत. हा आकडा तब्बल 41 लाख 15 हजार रुपये आहे. अनिकेत आणि अन्य उमेदवारांकडून लाखो रुपये घेतल्यानंतर बनावट नियुक्तीपत्र, ओळखपत्र देऊन नोकरी न देता पवार याने अनिकेत याची फसवणूक केली. त्यामुळे अनिकेत याने याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करीत आहेत.

