शिवनगर : ऊस वाहतूकदारांची फसवणूक थांबवावी : योगेश जगताप यांचे प्रतिपादन

शिवनगर : ऊस वाहतूकदारांची फसवणूक थांबवावी : योगेश जगताप यांचे प्रतिपादन

शिवनगर; पुढारी वृत्तसेवा : माळेगाव सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील अनेक साखर कारखान्यांच्या ऊस वाहतूकदारांना ऊसतोडणी मजुरांच्या मुकादमांकडून फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे संबंधित ऊस वाहतूकदारांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. अशा प्रकारांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माळेगाव साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांनी केले.
माळेगाव कारखाना कार्यस्थळावर आयोजित ऊस वाहतूकदार आणि पोलिस यंत्रणा यांच्या बैठकीत ते बोलत होते.

या वेळी पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक किरण अवचर, कारखाना उपाध्यक्ष सागर जाधव, संचालक राजेंद्र ढवाण, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे, उपाध्यक्ष सागर तावरे, अ‍ॅड. राजेंद्र काळे, अ‍ॅड.अभिजीत जगताप, अ‍ॅड.अमोल आटोळे, अ‍ॅड.प्रीतम वंजारी, शेतकी अधिकारी सुरेश काळे आदी उपस्थित होते.

योगेश जगताप म्हणाले, ऊस वाहतूकदार हे बहुतांशी शेतकरी तसेच त्यांची तरुण मुलेच असतात. अशावेळी ऊसतोडणी टोळीकडून लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याने संबंधित शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान होते. ऊस वाहतुकीचा व्यवसाय करून प्रपंचाला हातभार लावण्यासाठी धडपडणार्‍या शेतकरी युवकाची मोठी पंचायत होत आहे. अशा प्रकारांमुळे संबंधित व्यक्ती कर्जबाजारी होऊन कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे विदारक दृश्य पाहावयास मिळत आहे.

वाहतूकदार साखर कारखान्याने टोळी मुकादमांना देण्यासाठी दिलेल्या उचली शिवाय स्वत:चे अधिकचे पैसे देऊन करार करीत असतात. याचाच फायदा घेत अनेक मुकादम ऊस वाहतूकदारांना लाखो रुपयांना फसवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेने याची वेळीच दाखल घेऊन ऊस वाहतूकदारांना न्याय द्यावा, असे योगेश जगताप यांनी सांगितले. ऊस वाहतूक संघटनेचे अ‍ॅड.राजेंद्र काळे यांनी ऊस वाहतूकदारांची होत असलेली फसवणूक तसेच त्याचे व्यापकस्वरूप याबाबत सविस्तर माहिती दिली.

गुन्हा दाखल करणार
ऊस वाहतूकदारांची ऊसतोडणी टोळी तथा मुकादमांकडून होणार्‍या फसवणुकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संँधित साखर कारखाना, ऊस वाहतूकदार आणि ऊसतोडणी टोळी मुकादम यांच्यामध्ये झालेला करार याचा कायदेशीर अभ्यास करून सदर फसवणूक करणार्‍या ऊसतोडणी मुकादमांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी सांगितले.

ऊस वाहतूकदारांची ऊसतोडणी टोळी तथा मुकदमांकडून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. पोलिस यंत्रणेकडून आम्हाला न्याय मिळावा.

       -प्रकाश सोरटे, अध्यक्ष, श्री नीलकंठेश्वर ऊस वाहतूक संघटना, माळेगाव

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news