जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर येथील खते, औषधे बियाणे विक्री करणार्या दुकानदाराने 'अंकुर केदार' या भेसळयुक्त गहू बियाण्यांची विक्री करून फसवणूक केली. याप्रकरणी दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कृषी विभागाच्या अधिकार्यांनी हे दुकान व त्यांची सात अनधिकृत गोडाऊन सील केलेली आहेत.
सुशांत अरुण ढोले (रा. येणेरे, ता. जुन्नर) या शेतकर्याने या दुकान मालकाकडून गहू बियाण्यांबाबत झालेल्या फसवणुकीची फिर्याद पोलिस ठाण्यामध्ये नोंद केली आहे. त्यानुसार शेखर पांडव, आशिष शेखर पांडव (दोघेही रा. जुन्नर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पांडव शेती भांडार हे त्यांचे दुकान असून तेथे सुशांत हे गुरुवारी (दि. 17) सकाळी शेतामध्ये पेरण्याकरिता अंकुर केदार गहू बियाणे खरेदीसाठी गेलेले होते.
पांडव यांनी या गहू बियाण्यांऐवजी दुसरे भेसळ असलेले 15 किलो बियाणे वजन करून दिले. शेतकर्याला या बियाण्यांबाबत शंका आल्याने दुसर्या एका दुकानात जाऊन अंकुर केदार या बियाण्यांबाबत खात्री केली. पांडव यांनी दिलेल्या बियाण्यात त्यांनी स्वतः भेसळ केली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याबाबत शेतकर्याने त्यांना विचारणा केली असता पांडव यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
गहू बियाण्यांमध्ये आपली फसवणूक झाल्याचे खात्री झाल्यानंतर त्यांनी या दुकान मालकांविरोधात रात्री फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या दोनही दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.
दरम्यान या शेतकर्याने तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे झालेल्या फसवणुकीबाबत माहिती दिल्यानंतर तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, पंचायत समिती कृषी अधिकारी नीलेश बुधवंत यांनी दुपारी या दुकानाची समक्ष पाहणी केली. पांडव यांच्या दुकानाव्यतिरिक्त त्यांची इतर सात अनधिकृत गोडाऊन सील करण्यात आली.
या ठिकाणी 95 मेट्रिक टन (1900 बॅग) विविध प्रकारचा खते साठा आढळून आला असून 46 क्विंटल बियाणे आढळून आली आहेत. पांडव हे 3 ते 4 कंपन्यांची बियाणे त्यांना हक्क नसतानाही विक्री करताना निदर्शनास आले. तसेच या दुकानात चार प्रकारची मुदत संपलेली औषधे मिळून आली.
याबाबत दुकान मालक पांडव यांना नोटीस बजावण्यात आली असून या दुकानाचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावावर जलद गतीने नियमानुसार कारवाई होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, नीलेश बुधवंत यांनी स्पष्ट केले. जुन्नर येथे या व्यापार्याविरोधात झालेल्या या धडक कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. परिसरातील शेतकर्यांच्या पांडव यांच्या या दुकानाबाबत व त्यांच्या वागणुकीबाबत अनेक तक्रारी शेतकर्यांकडून व्यक्त होत आहेत.