पुणे शहरासह महामार्गावर चार्जिंग स्टेशन

पुणे शहरासह महामार्गावर चार्जिंग स्टेशन
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ होत आहे. महावितरणने देखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या चार्जिंग स्टेशनच्या उभारणीला वेग दिला आहे. पुणे परिमंडलांतर्गत सद्य:स्थितीत 15 चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाली आहेत. यापुढे पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या राष्ट्रीय महामार्गावर आणखी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील, अशी माहिती महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी दिली.

सेनापती बापट रस्त्यावरील गणेशखिंड उपविभाग कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारलेल्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन संचालक रेशमे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. रेशमे म्हणाले की, राज्य शासनाने ई-वाहन धोरणाद्वारे महावितरणची इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे.

ही जबाबदारी स्वीकारून व ई-वाहनांचा वाढता वापर पाहता महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तसेच नवीन चार्जिंग स्टेशनला सुलभ प्रक्रियेद्वारे तत्पर वीजजोडणी देण्यासाठी गती देण्यात आली आहे. त्यासाठी एक खिडकी स्वतंत्र वेबपोर्टल उपलब्ध आहे. तसेच ईव्ही ग्राहकांसाठी पॉवर अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. या अ‍ॅपमध्ये चार्जिंग स्टेशनचे लोकेशन, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, वापरलेले वीज युनिट, पेमेंटसाठी वॉलेट व बॅलन्स आदींची माहिती ग्राहकांना उपलब्ध होत आहे.
कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता तायडे, सतीश राजदीप, युवराज जरग, अरविंद बुलबुले, प्रवीण पंचमुख, डॉ. सुरेश वानखेडे आदींसह अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सध्या कार्यरत ईव्ही चार्जिंग स्टेशन

संघवीनगर (औंध), रिजन्सी इन्फ्रा (ननावरेवस्ती, औंध), गणेशखिंड उपविभाग कार्यालय परिसर (सेनापती बापट रस्ता), अमर पॅरॅडिगम (बाणेर), बेंचमार्क उपकेंद्र (पुनावळे, मुंबई हायवे), प्राधिकरण स्विचिंग स्टेशन (पुनावळे मुंबई-पुणे हायवे), सीआयआरटी उपकेंद्र (कासारवाडी, पुणे-नाशिक हायवे), कुणाल आयकॉन स्विचिंग स्टेशन (पिंपळे सौदागर), सेक्टर 10 स्विचिंग स्टेशन (भोसरी), सीडीसी स्विचिंग स्टेशन (स्पाइन रोड, शाहूनगर), ब्रम्हा सनसिटी (वडगाव शेरी), झेन्सार स्विचिंग स्टेशन (खराडी), कीर्ती कॅसल स्विचिंग स्टेशन (वडगाव शिंदे, लोहगाव), रेसकोर्स उपकेंद्र (रेस कोर्स), राजगुरुनगर उपकेंद्र (कडूस फाटा, चांडोळी, ता. राजगुरुनगर).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news