पुणे : सिंहगडावर पीएमपीसाठी उभारले ‘चार्जिंग स्टेशन’

पीएमपीकडून सिंहगडावर ई-बस चार्जिंगसाठी गुरुवारी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे.
पीएमपीकडून सिंहगडावर ई-बस चार्जिंगसाठी गुरुवारी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे.

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पीएमपीकडून सिंहगडावर ई-बससाठी गुरुवारी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून, 200 केव्ही (किलोवॅट) ट्रान्सफॉर्मर येथे नुकताच बसविण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच खासगी वाहनांना सिंहगडावर बंदी केली जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत येथील चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन होणार आहे.

सिंहगडावर खासगी वाहनांमुळे प्रदूषण व वाहनकोंडी होते. त्यामुळे किल्ल्यावर खासगी वाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणी होत होती. याबाबत दै. 'पुढारी'त वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी याची तत्काळ दखल घेतली. येथील खासगी वाहतूक बंद करून ग्रीन एनर्जीद्वारे पर्यटकांना वाहतूक पुरविण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाकडून सिंहगडावर आता पीएमपीच्या लहान 9 मीटर लांबीच्या ई-बसकडून सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी वनविभाग आणि पीएमपीकडून सिंहगडावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. येथील जागा आता बस पार्किंगसाठी पीएमपीच्या ताब्यात आली आहे. तसेच येथे पीएमपीच्या विद्युत विभागाने 200 केव्हीचा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर व बसगाड्यांसाठी एक चार्जिंग स्टेशनही उभारले आहे.

  • 200 केव्हीचा (किलोवॅट) ट्रान्सफॉर्मर बसविला
  • 80 केव्हीचा चार्जर करणार ई-बस चार्ज
  • 9 मीटर लांबीच्या ई-बस पर्यटकांना पुरविणार सेवा
  • 140 किलो वॅट प्रस्तावित
  • चार्जिंग स्टेशनकरिता स्वतंत्र केबिन

पीएमपी कर्मचार्‍यांना वॉकी-टॉकी-

सिंहगडावर वनक्षेत्र असल्याने नेटवर्क नसते. त्यामुळे येथे पीएमपी बस सुरू झाल्यावर दैनंदिन नियोजनात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यासाठी येथे सेवा पुरविणाऱ्या पीएमपीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याजवळ वॉकी-टॉकी असणार आहे. त्या संदर्भातील आदेश पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत.

सिंहगडावर पीएमपीची ई-बस सेवा सुरू करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, वन विभागाच्या मदतीने सर्व काम सुरू आहे. येथे नुकतेच एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून, त्याला विद्युतपुरवठा करण्यासाठी येथे 'ट्रान्सफॉर्मर' देखील बसविण्यात आला आहे. येथील इतरही कामे तातडीने सुरू आहेत.

                                 – डॉ. चेतना केरूरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news