पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातूनच यंदा विधी, अभियांत्रिकी, एमबीए आदी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा एमबीए, अभियांत्रिकी, विधीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी चांगलीच चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए, फार्मसी, लॉ, फाइन आर्ट्स अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्यानुसार अनेक परीक्षांची नोंदणी पूर्ण झाली असून, काही परीक्षाही झाल्या आहेत. त्याचप्रमाणे काही सीईटींच्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाली आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चरच्या प्रवेशासाठी होणार्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नोंदणी करतात. गेल्या वर्षी 6 लाख 36 हजार 804 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा ही संख्या वाढून 7 लाख 25 हजार 640 झाली आहे. त्यामुळे यंदा साधारण 90 हजार विद्यार्थी वाढल्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी चुरस वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी विधी तीन आणि पाच वर्षे अभ्यासक्रमांसाठी चांगलीच चुरस असते. यंदा विधी (तीन वर्षे) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणार्या सीईटीसाठी 80 हजार 125 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विधी (पाच वर्षे) अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी 33 हजार 8 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, अजूनही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे यंदा विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चांगलीच स्पर्धा होणार असल्याचे दिसून येत आहे.
यंदा एमबीए सीईटीला 1 लाख 38 हजार 683 विद्यार्थी बसले. या परीक्षेला गेल्या वर्षी 1 लाख 12 हजार 209 विद्यार्थी बसले होते. त्यामुळे एमबीए प्रवेशाच्या स्पर्धेत यंदा 26 हजार 474 विद्यार्थी जास्त आहेत. एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणार्या सीईटीसाठी 38 हजार 479 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. एमबीए आणि एमसीए अशा दोन्ही परीक्षा होऊन, काही दिवस झाले आहेत. त्यामुळे या परीक्षांच्या निकालाकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा