कोल्हापूर : फुटबॉल अंतिम सामन्यात राडा; पोलिसांचा लाठीमार | पुढारी

कोल्हापूर : फुटबॉल अंतिम सामन्यात राडा; पोलिसांचा लाठीमार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मैदानात खेळाडूंची हाणामारी, यामुळे समर्थकांनी केलेली बाटल्या व चप्पलफेक, हुल्लडबाजांनी मैदानात केलेला प्रचंड राडा, त्यामुळे अखेर पोलिसांच्या लाठीमारानंतर फुटबॉल सामना अखेर स्थगित करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. केएसए व सॉकर रेफ्री असोसिएशनच्या निर्णयानंतर सामना खेळविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, याप्रकरणी शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ या दोन्ही संघाच्या चौघा खेळाडूंवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित शिव-शाहू चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर नियोजित होता. शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यातील सामना पाहण्यासाठी नेहमीप्रमाणेच छत्रपती शाहू स्टेडियम फुटबॉलप्रेमींच्या गर्दीने खचाखच भरले होते. मात्र तमाम फुटबॉलप्रेमींची घोर निराशा झाली. खेळाडूंची अखिलाडू वृत्ती, पंचांकडून निर्णयाबाबतची दिरंगाई आणि समर्थकांची हुल्लडबाजी यामुळे सामना स्थगित करण्याची वेळ संयोजकांवर आली.

दरम्यान, या राड्यामुळे मैदान परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजावाडाचे निरीक्षक संजीव झाडे व लक्ष्मीपुरीचे निरीक्षक दिलीप पोवार यांनी समर्थकांसह खेळाडूंनाही लाठीचा प्रसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली. सामन्याचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, यशराजराजे, रोहित आर. पाटील, राजेंद्र भिंगे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते झाले. सामना 39 मिनिटे खेळला गेला.

यानंतर शिवाजी मंडळकडून झालेली चढाई रोखण्यासाठी पाटाकडील तालीम मंडळाचा गोलरक्षक राजीव मिरीयाला गोलपोस्ट सोडून मोठ्या डी बाहेरील आऊट क्षेत्रापर्यंत गेला. आऊटमध्ये शिवाजीचा खेळाडू इंद्रजित चौगुले याची लाथ त्याला लागली. यामुळे पाटाकडीलचा आघाडीपटू ओंकार मोरे इंद्रजितच्या अंगावर धावून गेला. यामुळे शिवाजीच्या करण चव्हाण-बंदरे व इतर खेळाडूही ओंकारच्या अंगावर धावले. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भिडले. यामुळे समर्थक हुल्लडबाजांना नेहमीप्रमाणे उधाण आले. अश्लील शिवीगाळ करत त्यांनी मैदानात चपला व पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यामुळे सामना थांबला. पंचांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. पोलिसांनीही दोन्ही संघांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तरीही पंचांचा निर्णय दोन्ही संघांकडून अमान्य करण्यात आला. यानंतर मुख्य पंच संदीप पोवार, अजिंक्य गुजर व अन्य सहकारी मैदानात 18 मिनिटे थांबले. मात्र दोन्ही संघ आपल्या निर्णयांवर ठाम राहिल्याने अखेर पंचांनी सामन्याचा निर्णय संयोजकांवर सोपवून मैदान सोडले. संयोजकांनी दोन्ही संघाशी बातचीत करून निर्णयाबाबत प्रयत्न केला. मात्र दोन्ही संघ आपल्या निर्णयावर कायम राहिले. अखेर पोलिसांनी मोठी कुमक मागविल्यानंतर संयोजकांनी सामना स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

सामना स्थगितीनंतरही हुल्लडबाजी सुरूच

सामना स्थगित झाल्यानंतर दोन्ही संघ ड्रेसिंग रूममध्ये गेले. समर्थकही नेहमीप्रमाणे मैदानात आले व त्यांनी ड्रेसिंग रूमला गराडा घातला. एकमेकांवर शेरेबाजी, शिवीगाळ व घोषणाबाजी सुरू केली. खेळाडूंचीही त्यांना साथ मिळाली. पोलिसांकडून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न झाला. तरीही हुल्लडबाजी सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांनी ड्रेसिंग रूममध्ये घुसून समर्थक व खेळाडूंना लाठीचा प्रसाद दिला. तसेच मैदानात जमलेल्या समर्थकांना पिटाळून लावले.

Back to top button