‘हर हर महादेव’चा जयघोष; श्री क्षेत्र भीमाशंकर येथे 2 लाख भाविक

‘हर हर महादेव’चा जयघोष; श्री क्षेत्र भीमाशंकर येथे 2 लाख भाविक
Published on
Updated on

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 17) रात्री 12 वाजता पवित्र शिवलिंगाला जलाभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. 'हर हर महादेव' व "जंगलवस्ती भीमाशंकर भगवान की जय"च्या जयघोषात तब्बल 2 लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. या वेळी भीमाशंकर मंदिर व सभामंडपाला विविध आकर्षक सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच रात्रीच्या सुमारास मंदिरावर लेझर शोचा झगमगाट व रोषणाई करण्यात आली आहे.

महाशिवरात्रीमुळे भाविक दोन दिवस आधीच श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मुक्कामी येतात. त्यात शनिवार, रविवार सुटी असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने आले होते. मंदिर गाभारा व परिसरात बेरीकेटिंग, आकर्षक फुलांची सजावट व रंगरंगोटी करण्यात आली होती. भीमाशंकरपासून अलीकडे सहा किलोमीटर अंतरावर टेम्पो, मिनी बस व मोठ्या वाहनांसाठी 5 नंबर वाहनतळावर व्यवस्था करण्यात आली होती, तर चारचाकी छोट्या गाड्यांसाठी वाहनतळ क्रमांक 3 व 4 येथे व्यवस्था करण्यात आली.

वाहनतळ क्रमांक 1 व 2 मध्ये मोटरसायकलची व्यवस्था केली होती. वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत मिनी बसची व्यवस्था होती. दर्शनबारीसह मुखदर्शन व पासची सुविधा भाविकांना देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आली होती. अनेक ठिकाणी मोफत फराळवाटप सुरू होते. भीमाशंकर येथील बेल-फूल विक्रेते, डोलीवाले, हॉटेल, लॉज, माळा, रुद्राक्ष, वनस्पती औषधे आदी 450 व्यावसायिकांना यंदा बऱ्यापैकी व्यवसाय मिळाला.

घोडेगाव व खेड पोलिस ठाण्याच्या वतीने सुमारे 22 पोलिस अधिकारी, 130 महिला व पुरुष पोलिस कर्मचारी, 80 होमगार्ड, सीआरपी पथकातील 1 अधिकारी, 60 कर्मचारी तसेच 2 दंगा काबू पथक आणि बाँम्ब शोधपथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरात 108 नंबरची रुग्णवाहिका, अग्निशामक बंबदेखील होता.

आळंदीतील स्वकाम सेवा मंडळाचे 40 महिला व पुरुष कार्यकर्ते मंदिर परिसर व दर्शनाबारी स्वच्छ करण्याचे काम करत होते. तर वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकपर्यंत भाविकांना जा – ये करण्यासाठी एसटी महामंडळाच्या 15 मिनीबस, एसटी बस 22 तर असे एकंदरीत 37 बसगाड्या होत्या.

दरम्यान, पूर्वाताई वळसे पाटील, सुभाषराव मोरमारे, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सरपंच दत्तात्रय हिले, पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, आंबेगावचे प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, खेडचे प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, माजी सभापती संजय गवारी, आंबेगावचे तहसीलदार रमा जोशी, देवस्थान अध्यक्ष सुरेश कौदरे, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज, सतीश डौले, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, अनंता गवारी, देवस्थान विश्वस्थ मधुकर शास्त्री गवांदे, रत्नाकर कोडिलकर, दत्तात्रय कौदरे, चंद्रकांत कौदरे, सरपंच दत्तात्रय हिले आदींनी यात्रेदरम्यान उपस्थित राहून शिवलिंगाचे दर्शन घेतले.

पोलिसांसह विविध विभागांची पथके
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे साखळीचोर, पाकीटमार करणारे व छेडछाड करणार्‍या व्यक्ती यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व चित्रीकरण करणारे पथके नेमण्यात आलेली आहेत. दिवस व रात्रीसाठी साध्या वेशातील पोलिस पथके नेमण्यात आली असून, अवैध दारू व भांग विक्री करणार्‍या व्यक्तींवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस यांची पथके ठेवण्यात आलेले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news