भोर : पुढारी वृत्तसेवा : भोरचा दौरा आणि लक्ष बारामती मिशन असून, खा. शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार हे पाच ते पंधरा दिवसांत काही ना काही मोठा बॉम्ब टाकतात. नुकतेच अजित पवार विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी जाहीरपणे मांडत आहेत. हा गोलमाल असून, या गोंधळात अजित पवारांना कोण थांबवणार? अशा खेळामुळे बारामती मतदारसंघात परिवर्तन नक्कीच घडणार असल्याचा विश्वास माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. भोर येथील गंगोत्री हॉलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या झालेल्या कारकिर्दीच्या मेळाव्याप्रसंगी माजी खासदार किरीट सोमय्या बोलत होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार शरद ढमाले, मुळशी तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, अण्णा देशमाने, तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शहराध्यक्ष सचिन मांडके, महिलाध्यक्ष दीपाली शेटे, स्वाती गांधी, सरपंच अमर बुदगुडे, पंकज खुर्द, विश्वास ननावरे, राजाभाऊ गुरव, सुनील कांबळे, राजेंद्र मोरे, कपिल दुसंगे, वैभव धाडवे, दिलीप लोहकरे, अमर ओसवाल, नितीन सोनवले आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सोमय्या म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक सर्जिकल स्ट्राईक, 370 कलम हटवण्याचे काम केले.
विकास हा मोठ्या लोकांचा केला नसून, सर्वसामान्य जनतेचा केला. शरद पवार बोलतात काय आणि डोक्यात कोणते काम असते, हे उद्धव ठाकरेंना कळलेले नाही. शरद पवार यांनी पंतप्रधान होण्याची स्वप्ने बघितली. तू मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बघत राहा, असा टोला त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. तसेच, जानेवारी महिन्यात अयोध्यामध्ये रामलल्लाची स्थापना होणार आहे. तत्पूर्वी बारामती मतदारसंघात भाजपचे रामलल्ला घडवा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शिंदे यांनी केले. सचिन मांडके यांनी प्रास्ताविक केले. अमर बुदगुडे यांनी आभार मानले.
भोर नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचा हातोडा फिरवणार
भोर नगरपालिकेमध्ये एकहाती सत्ता असून, भ्रष्टाचाराची काही प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. यामध्ये अनधिकृत बांधकामे, पाणी चोर प्रकरण, ऐतिहासिक शनिघाटाची मोडतोड, निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे याची सखोल माहिती घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून भोर नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचा हातोडा फिरवणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.