

पुणे : शरद पवार यांनी कधीच कोणत्या समाजाचे भले करण्याची भूमिका घेतली नाही. मराठा समाजाला त्यांनी कधीच आरक्षणाकडे नेले नाही. ओबीसी समाजाला कधी प्रगतीकडे नेले नाही, त्या शरद पवारांना जातीच्या उपसमित्या स्थापन करण्यावर वक्तव्य करण्याचा अधिकार नाही, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बुधवारी (दि.१७) केली.
उलट जेव्हा विशिष्ट समाजाला न्याय द्यायची गोष्ट येते, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक समाजाच्या मागे उभे राहतात, त्यांचे प्रश्न सोडवतात. मराठा आणि ओबीसी समाजासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या आहेत, अशा शब्दांत बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजूही मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बावनकुळे बोलत होते. 'दृष्कृत करणार्या समाजात माफी नसेल, दृष्कृत करणार्या समाजकंटकांना आणि व्यक्तींना आमचे सरकार सोडणार नाही,' असेही त्यांनी सांगितले.
ओबीसी समाजाविषयी असलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका स्पष्ट करताना बावनकुळे म्हणाले, आमचे सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी सुद्धा स्पष्ट करतो की, 'आम्ही ओबीसी समाजावर आणि अठरा पगड जातीवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. फडणवीस हे ओबीसी समाज, मराठा समाज आणि सर्व समाजाकरिता न्याय भूमिकेत आहेत, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालय पहिल्यांदा सुरू केले. अनेक योजना आणल्या. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात गेलेले ओबीसी समाजाचे आरक्षण पुन्हा परत आणण्याचे काम त्यांनी केले. मराठा समाजालाही आरक्षण देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे जो नेता, जो मुख्यंमत्री ओबीसी समाजाकरिता कार्य करत आहे, त्यांची गाडी अडविणे, त्यांच्या विरोधात घोषणा देणे ही चांगली गोष्ट नाही.
महसूल विभागाकडून दिले जाणारे प्रमाणपत्र सुरक्षितपणे दिले जाईल, याकडे लक्ष देणार आहोत. कोणीही चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न करेल, त्यांची संपूर्ण चौकशी आम्ही करू. खोटे प्रमाणपत्र कुठलेही प्रांत आणि तहसीलदार देणार नाहीत. याची खबरदारी सरकारने घेतली आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.