

पुणे: विकसित महाराष्ट्रासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्यासाठी अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच हे प्रवेश होत आहेत. भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांची संमती घेऊनच नव्या कार्यकर्त्यांना पक्षात घेतले जात आहे, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केले.
ते जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, काँग्रेसमधील खालच्या स्तरावरील कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाकडे विकासाचे कोणतेही स्पष्ट उद्दिष्ट नाही, ना देशासाठी भूमिका आहे.
राज्यातील नेतृत्वाची सुद्धा हीच परिस्थिती आहे. केवळ ईव्हीएमवर दोष देऊन चालत नाही. विकासासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते. काँग्रेसमधून भाजपमध्ये येणार्या कार्यकर्त्यांचे स्वागत आहे, कारण हे कार्यकर्ते विकासाला प्राधान्य देणारे असतात, अशी पुष्टीसुद्धा त्यांनी या वेळी केली. (Latest Pune News)
सरकारने निवडणुकीपूर्वी जो संकल्प केला होता, तो पूर्ण करण्यासाठी 1,800 दिवसांची म्हणजेच पाच वर्षांची मुदत असते. त्या कालावधीत सरकार शेतकर्यांच्या कर्जमाफीसह एकही संकल्प सोडणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी त्यांच्या विभागाचे निधी इतर ठिकाणी वळविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, नेमके शिरसाठ काय म्हणाले हे मी ऐकलेले नाही.
मात्र, पैशांचे सोंग करून चालणार नाही. राज्याला उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधावे लागतील. त्यासाठी केंद्र सरकारकडून मदत घेण्याचा विचार आहे. राज्य सरकारही काही प्रकल्प राबवत आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी घेतला जाईल. सामाजिक न्याय विभागात, विशेषतः आदिवासी भागातील लाभार्थ्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.