कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी बहुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. परंतु, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला रिक्षा, कार उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वाहनांचे पार्किंग इतर जागेवर हलविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे शहराचा पश्चिम दरवाजा म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. भूगाव, पौड, मुंबई, सातारा आणि पाषाणकडे जाणे या चौकातून सोईस्कर ठरते.
अनेक ठिकाणचे रस्ते या चौकात जोडले असल्याने या ठिकाणी वाहनांची नेहमीच वर्दळ असते. चौकात उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण केल्याने वाहतूक कोंडीची समस्या कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहेत. मात्र, सातार्याकडून मुंबईकडे जाणार्या मुख्य महामार्गालगत कार उभ्या करून चालक प्रवाशांची वाट पाहात या ठिकाणी थांबत आहेत. तर मुळशीकडे जाणार्या भुयारी मार्गाच्या वळणावर रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. रस्त्याच्या कडेला व वळणावर वाहने उभी राहात असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.
मुळशीकडून कोथरूडकडे जाणार्या मार्गावर उड्डाणपुलाखाली डाव्या बाजूला दररोज रिक्षांची रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. रिक्षाच्या रांगेसमोर वारजेच्या दिशेला जाणारे प्रवासी वाहनांची वाट पहात असतात.
वारजेकडे जाण्यासाठी नागरिकांच्या गर्दीतून वाहने न्यावी लागत आहेत. तर डाव्या बाजूला रिक्षा उभ्या राहात असल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत आहे. पर्यायाने याठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे अनेकदा किरकोळ अपघातांचे प्रकारही घडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत महामार्ग विभागाचे अधिकारी अंकित यादव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. चांदणी चौकाचा विकास झाला आहे. मात्र, रस्त्यावर कार व रिक्षा उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. चौकातून कोथरूड किंवा मुळशीकडे जाण्यासाठी ही वाहने सोईस्कर ठरत आहेत. परंतु, या ठिकाणी वाहने उभी करणे योग्य नसून अपघाताची शक्यता नाकारात येत नाही. – रमेश उभे, सामाजिक कार्यकर्ते
चांदणी चौक हा तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. वेदभवन येथे वारजे वाहतूक विभागाचे पोलिस उभे असतात, तर बावधनकडून चांदणी चौकाकडे जाणार्या मार्गावर हिंजवडी वाहतूक विभागाचे (पिंपरी- चिंचवड) पोलिस असतात. कोथरूड पोलिस येथे कुठेही दिसत नाही. पुलाखाली व सेवा रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगकडे पोलिसांचे लक्ष कसे जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांनी योग्य समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा