पुणे : पुढारी वृत्तसेवा : कात्रज संतोषनगरमधील घुंगरूवाला चाळ येथील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भारती विद्यापीठ, सिंहगड रोड आणि सहकारनगर पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना चांगलेच फैलावर घेतले. यापुढे जर हद्दीत असे प्रकार घडले तर सोडणार नाही, असा दम देखील भरला. या वेळी अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, तिन्ही पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तपास पथकांचे प्रमुख आणि अंमलदार उपस्थित होते.
संतोषनगर घुंगरूवाला चाळ येथे बुधवारी (दि. 20) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन टोळक्यांत झालेल्या वादातून कोयत्याने वार करून गोळी झाडण्यात आली होती. याप्रकरणी दोन टोळक्यांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करून काही आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.
मात्र, दुसर्या दिवशी भारती विद्यापीठ, सिंहगड रोड आणि सहकारनगर पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी आणि तपास पथकाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्तालयात बोलावून घेतले होते. त्यांनी अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांच्यासमोर तपास पथकांची चांगलीच हजेरी घेतली. त्याचबरोबर सर्व्हिलन्सचे काम करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांनासुद्धा फैलावर घेतले.
गोळीबार आणि कोयत्याने मारहाण प्रकरणातील काही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून असे प्रकार घडल्यामुळे आयुक्त चांगलेच चिडले. त्यांनी पदभार घेतल्यानंतर पोलिस निरीक्षकांच्या घेतलेल्या पहिल्याच बैठकीत गुन्हेगारी कमी झाली पाहिजे, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील वाहन तोडफोड, जबरी चोर्या, लूटमार, कोयत्याने वार आणि गोळीबार, अशा घटना घडत आहेत.
ज्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले, तो पूर्वी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होता. त्याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. ज्या पोरांनी पिस्तूल आणून गोळी झाडली, ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आहेत आणि जेथे मारहाण आणि गोळीबाराची घटना घडली तो परिसर भारती विद्यापीठ पोलिसांच्या हद्दीत येतो. त्यामुळे या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या तपास पथकांना पोलिस आयुक्तांनी बोलावून घेतले होते.
हेही वाचा