

पुणे: महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पसार होणारे चोरटे, शस्त्राचा धाक दाखवत रात्रीच्या वेळी वाटसरूंना लुटणाऱ्या टोळक्यांनी शहरात चांगलाच धुडघूस घातला होता. सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांपर्यंत प्रत्येकालाच अशा गुंडांची धास्ती होती.
परंतु, मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सोनसाखळी आणि जबरी चोऱ्यांच्या गुन्ह्यांचा आलेख घटल्याचे दिसून आले आहे. पोलिसांकडील आकडेवारीनुसार, सन २०२४ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत सोनसाखळी चोरी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे निदर्शनास येते.
सोनसाखळी चोरीच्या २०२४ मध्ये शहरात १२० घटना नोंदविण्यात आल्या होत्या. २०२५ मध्ये हा आकडा १७४च्या घरात आहे. तर, यंदा २७ जुलैपर्यंत केवळ ५८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हाच आकडा मागील वर्षी जुलै महिन्यात १०५ होता. त्यामध्ये चालू वर्षात ४७ ने घट झाली आहे.
सोनसाखळी चोरी ही महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानली जाते. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या सराईत टोळ्यांविरोधात पोलिसांनी सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या. तसेच, गुन्हे करणाऱ्या अशा गुन्हेगारांवर मोक्का आणि स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याने या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येते.
जबरी चोरी, लुटमारीच्या घटनांमध्येही पोलिसांनी प्रभावी अंकुश मिळवला आहे. २०२४ मध्ये शहरात ३८२ गुन्हे नोंदवले गेले होते. २०२५ मध्ये हा आकडा ४०७ पर्यंत पोहोचला होता. मात्र, यंदा २७ जुलैपर्यंत तो १५१ वर आला आहे. विशेष म्हणजे जुलै २०२६ महिन्यातील लुटमारीच्या घटनांमध्येही मागील वर्षांच्या तुलनेत ९५ ने घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
मध्यवर्ती पुण्यातील शिवाजीनगर, डेक्कन, खडक, फरासखाना आणि विश्रामबाग परिसरात वाढीव गस्त आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे रस्त्यावरील गुन्ह्यांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळाले आहे. तर, हडपसर, कोंढवा, लोणीकंद, चंदननगर आणि वाघोलीसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या भागांमध्ये अजूनही गुन्हेगारांचे आव्हान कायम असले, तरी तेथील गुन्ह्यांचाही आलेख मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
पोलिसांच्या मते, सराईत गुन्हेगारांवर केलेली कठोर कारवाई, सातत्याने राबविण्यात येणारी कोम्बिंग ऑपरेशन्स, नाकाबंदी आणि रात्रगस्त यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावरील लुटमारीचे प्रकार कमी होण्यास मदत झाली आहे.
परिमंडळ दोन हॉटस्पॉट
एकंदर शहरातील परिमंडळनिहाय सोनसाखळी चोरी आणि जबरी चोऱ्यांचा विचार केला, तर परिमंडळ दोनमध्ये सर्वाधिक हे गुन्हे घडले आहेत. परिमंडळ दोनमध्ये सोनसाखळी चोरीचे चालू वर्षात जुलै अखेर १८ गुन्हे दाखल असून, जबरी चोरीचे ४० गुन्हे दाखल आहेत. स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, भारती विद्यापीठ आणि आंबेगाव या पोलिस ठाण्याचा परिमंडळ दोनमध्ये समावेश होतो.
रस्त्यावरील पोलिसांची वाढती गस्त, नाकाबंदी, सराईत चोरट्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई, कोम्बिंग ऑपरेशनमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोनसाखळी आणि जबरी चोऱ्यांच्या घटनामध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर