

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशातून अलिकडेच सुमारे चार लाख कोटी रुपयांची कृषिमाल निर्यात पूर्ण झालेली आहे. कृषिमालाचे वाढत असलेले उत्पादन आणि उत्पादकतेच्या परिवर्तनात शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांचे योगदान अविस्मरणीय असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काढले. मात्र, बदलत्या हवामान परिस्थितीत देशाची 2050 मधील खाद्यान्नांची गरज पूर्ण करण्याचे आव्हान असल्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला.
येथील कृषी महाविद्यालयाने कृषी अनुसंधान परिषदेस (आयसीएआर) शिवाजीनगर येथील आवारातील जागा दिली आहे. त्या ठिकाणी अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (अटारी) प्रशासकीय इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते गुरुवारी (दि.19) दुपारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यासह आयसीएआरचे अतिरिक्त महासंचालक डॉ. व्हीं. पी. चहल, गुजरातमधील नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती विद्यापीठाचे कुलगुरू सी. के. टिंबडिया, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, जालना येथील मराठवाडा किसान मंचचे विजयअण्णा बोराडे, भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ राजेंद्र चापके, आयसीएआरचे पुण्यातील संचालक डॉ. लाखन सिंग उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्रांचे संचालक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते 'नैसर्गिक शेती काळाची गरज' व 'पौष्टिक तृणधान्ये' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कृषी विकासामध्ये कृषी विज्ञान केंद्रांचे (केव्हीके) मोठे योगदान असल्याचे नमूद करून तोमर म्हणाले, आयसीएआर संस्थेने केलेली रचना यामध्ये महत्त्वाची असून, त्याचा फायदा कृषी क्षेत्राला होत आहे. बी-बियाणे, नवे तंत्रज्ञान प्रगतीपथावर आहे. देशाची अन्नधान्य व अन्य शेतमालाची गरज पूर्ण करून आपण शेतमाल निर्यातीमध्ये काही वस्तूंच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहोत. कोरोनाकाळात सर्व क्षेत्रे ठप्प झालेली असताना भारताचे कृषी क्षेत्र कायम कार्यरत राहिले, त्यामुळे आपली गरज पूर्ण करून आपण अन्य देशांना अन्नधान्य निर्यात करू शकलो.