पुणे : ’कितनी बदबू आ रही है, साफ करो ! मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून ठेकेदारसाहित अधिकारी, कर्मचारी धारेवर

पुणे : ’कितनी बदबू आ रही है, साफ करो ! मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून ठेकेदारसाहित अधिकारी, कर्मचारी धारेवर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दररोज लाखभर प्रवासी ये-जा करणार्‍या पुणे रेल्वे स्थानकावर गुरुवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी आले. स्वच्छतागृहात जाताच नाकाला हात लावला व त्यांचा पारा चढला. म्हणाले, 'कितनी बदबू आ रही है, साफ करो, ठेकेदार कौन है, उसे बुलाव,' अशी प्रश्नांची सरबत्ती करताच ठेकेदारही हजर झाला. त्याची महाव्यवस्थापकांनी चांगलीच खरडपट्टी काढली.

रेल्वे स्थानकावरील अस्वच्छ स्वच्छतागृहे, स्टॉलधारकांच्या परवान्यामध्ये गोंधळ, अग्निशामक यंत्रणेबाबत स्टॉल कर्मचार्‍यांचे अज्ञान पाहून, पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेले लालवाणी चांगलेच संतापले. सुमारे तासभर त्यांनी स्थानकासह अधिकारी व कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली. त्यांनी स्टेशनभर फिरून प्रवासी तक्रार पुस्तिका, नादुरूस्त जिना, प्रवाशांच्या तिकिटासाठी लागलेल्या रांगा, आयआरसीटीसीचे नादुरूस्त कँटीन, प्रतीक्षालयातील प्रवाशांची नाराजी याचा आँखो देखा हाल पाहिला. त्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांची तासभर शाळा घेतली.

मन लावून काम करा…

लालवाणी यांनी अधिकार्‍यांना प्रवासी केंद्रित सेवा पुरवाव्यात, अशा कडक सूचना केल्या. या वेळी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, मुख्य अभियंता राजेश अरोरा, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक मणिजीत सिंह, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (स्टेशन विकास) व्ही.के. अग्रवाल, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, स्टेशन डायरेक्टर डॉ.रामदास भिसे व अन्य उपस्थित होते. दरम्यान, पुणे स्थानकाची पाहणी केल्यावर लालवाणी यांनी जाताना 'मन लावून, प्रामाणिकपणे काम करा' अशा रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकार्‍यांना कडक सूचना दिल्या.

कँटीन आणि  स्टॉलधारकांचे परवाने तपासले

लालवाणी यांनी स्थानकावरील आयआरसीटीसीच्या कँटीन आणि स्थानकावरील स्टॉलवाल्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनी प्रत्येक दुकानाचा परवाना तपासला. या वेळी त्यांना एक स्टॉलवाला दुसर्‍याच्या परवान्यावर स्टॉल चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्या स्टॉलवाल्यासह आयआरटीसीच्या अधिकार्‍यालाही चांगलेच सुनावले.

अग्निशमन यंत्रणा कालबाह्य…

तसेच त्या स्टॉलवाल्याकडे अग्निशामक यंत्रांची मागणी केली. त्याची कालबाह्य मुदत तपासली. त्यासोबतच त्याला हे चालविण्याचे प्रशिक्षण आहे का, हेदेखील पाहिले. मात्र, त्याला हे जमले नाही. त्यामुळे महाव्यवस्थापकांनी संबंधित स्टॉलवर कारवाई करण्यास पुणे विभागातील अधिकार्‍यांना सांगितले.

रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांशी साधला संवाद

महाव्यवस्थापकांनी स्थानकावरील तिकीट खिडक्यांचीसुध्दा तपासणी केली. या वेळी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला. त्या वेळी प्रवाशांनाही आनंद झाला. तसेच पुणे स्थानकावरील उच्चश्रेणी प्रतीक्षालय, महिला प्रतीक्षालय, स्लीपर (शयन) प्रतीक्षालयांची आणि त्यातील स्वच्छतागृहांची पाहणी केली. या वेळीसुध्दा त्यांनी भेटलेल्या प्रत्येक प्रवाशांशी संवाद साधत, त्यांना स्थानकावर काही समस्या येत आहेत का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नादुरुस्त जिना  7 दिवसांत दुरुस्त करा…

लालवाणी यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील बंद असलेल्या जिन्याची या वेळी पाहणी केली. हा जिना बंद असल्यामुळे येथे 'पिक अवर'मध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे महाव्यवस्थापकांनी या जिन्याची पाहणी झाल्यावर हा जिना सात दिवसांत दुरुस्त करून प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्याच्या सूचना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news