पुणे: मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाच्या काही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटसंदर्भात शासनाकडून अध्यादेशही काढण्यात आला आहे. या निर्णयाचा स्वारगेट येथील केशवराव जेधे पुतळा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी राज्य समन्वयक राजेंद्र कुंजीर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय पाटील, आबा जगताप, मयूर गुजर, मयूरेश पाटील, समीर इंदलकर, वैभव शिळीमकर, केदार वीर, वसंत खुटवड, आशिष साबळे, अशोक पवार, दत्तात्रय शेंडकर यांसह मोर्चाचे कार्यकर्ते आणि मराठा समाजातील नागरिक उपस्थित होते. (Latest Pune News)
या वेळी राजेंद्र कुंजीर म्हणाले, शासनाकडे ज्या मागण्या केल्या होत्या, त्यामध्ये मराठा कुणबी हे एकच आहेत आणि ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे, अशी प्रामुख्याने मागणी होती. ही मागणी मान्य करून शासनाने हैदराबाद गॅझेटसंदर्भात अध्यादेशही काढलेला आहे. परंतु, निजामांच्या काळात त्यांनी 1955-56 मध्येच औंध, सातारा, मुंबई, निजाम, हैदराबाद गॅझेट सरकारकडे सुपूर्त केलेले आहे. आता सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांनी हे सर्व गॅझेट शोधून काढावेत.
शासनाकडून हा अध्यादेश काढला आहे. परंतु, त्याचवेळी आम्ही मराठा-कुणबी असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊ, असे सरकारकडून सांगण्यात आले. सरकारने आता हे प्रामाणिकपणे केले, तरच या अध्यादेशाला अर्थ राहणार आहे.
त्याचबरोबर न्यायमूर्ती शिंदे समितीमध्ये इतिहासकार विश्वास पाटील यांना सदस्य म्हणून सहभागी करून घ्यावे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध कागदपत्रे आणि गॅझेट शोधण्याचे काम केलेले असून, त्यांच्याकडेही भरपूर माहिती आहे. त्यामुळे त्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणीही कुंजीर यांनी या वेळी केली.
अजय पाटील म्हणाले की, 45 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठ्यांचे स्वप्न पूर्ण केले. स्व. अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेला आरक्षणाचा प्रवास हा मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून संपलेला आहे. सरकारने मंजूर केलेले हे आरक्षण आता मराठा समाजाला द्यावे.