पिंपरी : पालिकेचा नाही सीबीएसई बोर्ड शाळांसाठी पुढाकार

पिंपरी : पालिकेचा नाही सीबीएसई बोर्ड शाळांसाठी पुढाकार

पिंपरी(पुणे) : पालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई – लर्निंगवर भर देऊन विद्यार्थ्यांना डीजिटल शिक्षण देण्यात येत आहे. काही शाळा सेमी इंग्लिश देखील आहेत. मात्र, खासगी शाळांप्रमाणे सुविधा देवूनही सीबीएसई बोर्डचा अभ्यासक्रम नसल्याने शाळांना प्रतिसाद कमी आहे.

खासगी शाळांचा ओढा कमी होईल

पालिकेने याच शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रम सुरू केल्यास सध्या खासगी शाळा देत असलेले महागडे शिक्षण आणि भरमसाठ फी यांना आळा बसू शकेल आणि सर्वसामान्य व गोरगरीब मुलांना देखील दर्जेदार शिक्षण मिळू शकेल. मात्र, पालकांकडून अव्वाच्यासवा सीबीएसई शाळा शुल्क वसूल करत आहे. त्यामुळे सीबीएसई शाळेच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. अशा परिस्थितीत पालिकेतील शाळांत सीबीएसई अभ्यासक्रम सुरु केल्यास पालकांचा खासगी शाळांकडील ओढा कमी होईल.

महाराष्ट्र राज्य बोर्ड व सीबीएसई बोर्ड

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ हे राज्यात शालेय शिक्षण व्यवस्था पाहणारी हा शासनाचा विभाग आहे. अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे ठरवत असते. तो अभ्यासक्रम फक्त राज्यापुरता मर्यादित असतो. तर सीबीएससीचा अभ्यासक्रम हा पूर्ण भारतामध्ये सारखाच असतो. त्यामुळे नोकरदार व कामानिमित्त देशातील इतर राज्यांत जाणार्‍या पालकांच्या पाल्यांसाठी हा अभ्यासक्रम सोयीस्कर ठरतो. सध्या अनेक पालकांचा पाल्यांना सीबीएसई अभ्यासक्रमातून शिकवण्याचा कल वाढत आहे.

महापालिकेच्या 128 शाळा

महापालिकेच्या वतीने शहरात 110 प्राथमिक व 18 माध्यमिक शाळा चालवल्या जातात. त्यात मराठी माध्यमाबरोबर हिंदी, इंग्रजी माध्यमांच्या शाळाही आहेत. मात्र या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे 45 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके, गणवेश, बुट, दप्तर, सर्व काही अगदी मोफत दिले जाते.

शिवाय माध्यान्ह भोजनही मिळते. शाळांच्या इमारतीही आकर्षक आहेत. या शाळांचा दहावीचा निकालही उत्तम असतो. त्यामुळे पालिका शाळांत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने पालिकेच्या पाच इंग्रजी माध्यमांच्या शाळा आकांक्षा फाऊंडेशनला चालविण्यास दिल्या आहेत. या शाळांमध्ये सध्या प्रवेशासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळतात.

टाळगाव चिखली येथे पालिकेची एक सीबीएसई बोर्डाची शाळा आहे. पालिकेच्या शाळांमध्येदेखील सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रम प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू करण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी खूप तयारी करावी लागेल. त्या शाळांचे निकष वेगळे असतात. कोणत्या शाळांत सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रम सुरू करावा, यावर चर्चा करण्यात येणार आहे.
                             – संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी पिं. चिं. मनपा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news