

देऊळगावराजे(दौंड) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सध्या घरगुती व शेतीपंपाच्या वीजबिलाच्या वसुलीबरोबरच वीज चोरणार्या म्हणजेच आकडेबहाद्दरांविरुद्ध महावितरणने जोरदार मोहीम सुरू केली आहे. मौजे राजेगाव येथील 14 व पाटस येथील 5, अशा एकूण 19 जणांवर नुकतीच कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरण मुख्य कार्यालय मुंबई यांच्या आदेशावरून 7 ते 15 फेब्रुवारी यादरम्यान विशेष नियुक्त केलेले अधिकारी उपकार्यकारी अभियंता नाईकवाडी व सहायक अभियंता सोनवणे यांनी कायमस्वरूपी वीज खंडित करण्यात आलेल्या घरगुती वीजग्राहकांची मोबाईल अॅपद्वारे प्रत्यक्ष स्थळतपासणी केली. यामध्ये बरेच ग्राहक अनधिकृत वीज वापर करीत असल्याचे आढळून आले असून, त्यांच्यावर महावितरणकडून कारवाई करण्यात आली आहे.
मुख्य अभियंता पावडे यांच्या आदेशानुसार अधीक्षक अभियंता पाटील तसेच कार्यकारी अभियंता एडके यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे, सहायक अभियंता जीवन ठोंबरे यांनी राजेगाव येथील 14 व पाटस येथील 5 जणांवर दौंड व यवत येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कामी सहायक अभियंता वैभव पाटील, कनिष्ठ अभियंता अमित धोत्रे तसेच बिलिंग विभाग व जनमित्र यांचे यात सहकार्य लाभले.