Indapur Tehsildar Attack | मुख्य आरोपी इंदापूर न्यायालयात शरण

Indapur Tehsildar Attack | मुख्य आरोपी इंदापूर न्यायालयात शरण

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापुरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील हल्ल्यातील मुख्य आरोपी शिवाजी किसन एकाड (रा. बाब्रस मळा, ता. इंदापूर) रविवारी (दि. 2) इंदापूर न्यायालयात स्वतःहून हजर झाला. न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करीत असताना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, शिवाजी एकाड याचा कारचालक सुनील उध्दव माळवदकर (वय 40, रा. निराळेवस्ती, विठ्ठलनगर, सोलापूर), प्रेम ऊर्फ निखिल रमेश काशिद, शिल्पा रमेश काशिद (दोघे रा. सरडेवाडी, ता. इंदापूर) आदींना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांची तमा न बाळगता, कार वेगात सुटली..

पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी याबाबत सांगितले की, एकाडच्या भ्रमणध्वनीचे संकेतस्थळ शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. सोलापूर शहराच्या बाजूने त्याचे संकेतस्थळ मिळाले होते. सकाळपासून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. एका कारमधून तो प्रवास करीत असल्याचे पोलिसांना समजले. सरडेवाडी टोल नाक्यानजीक पोलिसांचे पथक वाहन तपासण्यासाठी सज्ज होते. एकाड ज्या कारमध्ये बसला होता ती थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, चालकाने भरधाव वेगाने इंदापूरच्या दिशेने कार पळवली.

थरार पाहून नागरिक थक्क!

इंदापूर शहरात रविवारी आठवडे बाजार असतो. भरधाव कारमुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपीच्या कारचा पाठलाग केला. भरधाव वेगात कार इंदापूर न्यायालयाच्या आवारात शिरली. हा थरार पाहून नागरिक थक्क झाले. एकाड याने न्यायालयासमोर जाऊन शरणागती पत्करली. इंदापूर न्यायालयाने त्याला 4 जून पर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तसेच प्रेम रमेश काशीद, शिल्पा रमेश काशीद व सुनील उद्धव माळवदकर यांना 5 जूनपर्यंत कोठडी दिली.

अन्य तिघांना उद्यापर्यंत कोठडी

तहसीलदार हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी एकाड याच्यासह अन्य तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news