

पुणेः वानवडी पोलिस ठाण्यातील चार पोलिसांनी कर्नाटकातील सराफावर दबाव टाकून 28 तोळे सोने लाटल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्तांनी या कर्मचार्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मात्र प्रकरणात अचानक ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सोने लाटल्याची तक्रार केलेल्या सराफाने प्रतिज्ञापत्र देऊन तक्रार मागे घेतली आहे. यामुळे सराफावर कोणी दबाव टाकला का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. तर एकीकडे पुणे पोलिस शहरात कोयता गँग अस्तित्वात नसल्याचा दाव करतात. तर दुसरीकडे हे चौघे पोलिस मात्र शहरात कोयता गँग असून, त्यांनी पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचे सांगतात. (latest pune news)
हा संपूर्ण प्रकार बल्लारी (कर्नाटक) येथील सराफा व्यावसायिक कपिल मफतलाल जैन यांच्याशी संबंधित आहे. जैन यांनी तक्रार केली होती की, वानवडी पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी जुन्या चोरीच्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुकानात आले आणि दबाव टाकून सोने घेऊन गेले.
पोलिस हवालदार महेश विठ्ठल गाढवे, हवालदार सर्फराज नूरखान देशमुख, शिपाई संदिप आनंदा साळवे व शिपाई सोमनाथ पोपट कांबळे यांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कोयता गँगमधील आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे सांगितले.
त्यानुसार जैनने 10 ग्रॅमच्या नेकलेसच्या बदल्यात 30 हजार रूपये दिल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतरही वानवडी पोलिसांनी तू चोराकडून 100 तोळे सोने घेतले असून ते चोरीचे असल्याचा दबाव टाकला. गुन्ह्याच्या तपासासाठी दागिने ताब्यात दे, असे सांगत चौघांनी तडजोडीअंती 280 ग्रॅम सोने स्वतःकडे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिस सोने घेऊन गेल्यानंतर जैन यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात चौकशी केल्यानंतर स्पीड पोस्टद्वारे पुणे पोलिसांकडे संबंधिताविरूद्ध तक्रार दाखल केली.
चार पोलिसांनी केलेल्या कृत्यामुळे पोलिस खात्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कर्तव्यात कसुरीसह विविध कारणे दाखवा नोटीस त्यांना पाठविली. त्यावर, अंशत: समाधान झाल्याने भविष्यात सुधारण्याची संधी देत नोटीसमध्ये दिलेल्या शिक्षेमध्ये बदल करत परिमंडळ पाचचे पोलिस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सर्व आरोपींना प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दरम्यान, कपिल जैन यांना केलेली तक्रार मागे घ्यायची होती, तर त्यांनी तक्रार केलीच का? की त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? की त्यांना या चौघा पोलिसांनी मॅनेज केले असे अनेक सवाल निर्माण होत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी एकमेकांमध्ये सोने वाटून घेतले नसेल तर त्यांना पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कशी काय करण्यात आली, हा देखील मोठा सवाल आहे.
पोलिसच म्हणतात पुण्यात कोयता गँग?
एकीकडे पोलिस पुण्यात कोयता गँग नसल्याचा दावा करतात. तर दुसरीकडे मात्र वानवडी पोलिस ठाण्यातील या चार कर्मचार्यांनी कर्नाटकातील सराफाला दरडावण्यासाठी पुण्यात कोयता गँग असल्याचे म्हटले आहे. तू जे सोने घेतले आहे ते कोयता गँगचे लोकं आहेत. त्यांनी पोलिसांवर सुद्धा हल्ला केला आहे.
एका सहायक पोलिस निरीक्षकांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. मागील काही महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. त्यामुळे नेमंक कोयता गँगबाबात खरं कोणाचं म्हणायचं. पुणे पोलिसांचं की वानवडी पोलिस ठाण्यातील त्या चार कर्मचार्यांचे...?
प्रकरणात संशयाला वाव असल्यामुळे आणि चर्चेमुळे पोलिस खात्याची बदनामी झाल्यामुळे संबंधित अमलदारांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार आणखी यामध्ये चौकशी होऊ शकते.
- डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ पाच