

पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसर्या फेरीसाठी 10 ते 13 जुलैदरम्यान प्रवेशासाठी नवीन नोंदणी करणे तसेच अर्जाचा भाग एक व दोन भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार आज (दि. 13) संबंधित प्रक्रिया करण्याचा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत 1 लाख 35 हजार 72 विद्यार्थ्यांनी नव्याने नोंदणी केली आहे, तर 5 लाख 44 हजार 7 विद्यार्थ्यांनी दुसर्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविले असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे. (Latest Pune News)
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 469 महाविद्यालयांमध्ये 17 लाख 60 हजार 98 जागा मकॅप प्रवेशाफच्या तसेच 3 लाख 72 हजार 862 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 32 हजार 960 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 13 लाख 83 हजार 859 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी 4 लाख 32 हजार 287 विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे तसेच 75 हजार 809 विद्यार्थ्यांनी विविध कोटाअंतर्गत अशा एकूण 5 लाख 8 हजार 96 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी कॅप प्रवेशाच्या 13 लाख 27 हजार 811 आणि कोटा प्रवेशाच्या 2 लाख 97 हजार 53 अशा एकूण 16 लाख 24 हजार 864 जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 10 ते 13 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी करणे, अर्जाचा भाग एक आणि दोन भरणे, कागदपत्रांची पडताळणी आदी कामे करता येणार आहेत. प्रवेशाच्या दुसर्या फेरीसाठी गुणवत्ता यादी 17 जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे.
विद्यार्थी 18 ते 21 जुलै या कालावधीत प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकतात, तर 23 जुलै रोजी तिसर्या फेरीसाठी प्रवेशाच्या रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत. संबंधित तारखांनुसारच कोटा अंतर्गत प्रवेश प्रक्रियादेखील राबवली जाणार आहे. त्यामुळे कोटाअंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित वेळापत्रकानुसार महाविद्यालयात प्रवेशासाठीची कार्यवाही करावी, असेदेखील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
...असे आहे दुसर्या फेरीचे वेळापत्रक
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी तसेच अर्जाचा भाग एक आणि दोन भरणे - 10 ते 13 जुलै
दुसर्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करणे - 17 जुलै
विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे - 18 ते 21 जुलै