पुणे : महापालिकेसह विधानसभा निवडणुकीती इच्छुक उमेदवारांची गोची

पुणे : महापालिकेसह विधानसभा निवडणुकीती इच्छुक उमेदवारांची गोची

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकमेकांचे थेट प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीतील अजित पवार गट आणि भाजप हे आता एकमेकांसमवेत आल्याने महापालिकेसह विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांची मोठी गोची होणार आहे. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीची तयारी करणार्‍या दोन्ही पक्षांतील अनेक इच्छुकांना थेट तलवार म्यान करावी लागेल. याशिवाय उमेदवारीच्या तिकीट वाटपाचाही मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच प्रमुख दोन मोठे पक्ष आहेत.

पुणे महापालिकेत भाजप सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद होते. तर शहरातील आठपैकी वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला, कोथरूड आणि पर्वती या विधानसभेच्या पाच जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवितात. आता मात्र राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थक गट थेट भाजपसमवेत आल्याने सर्वच निवडणुकीची गणिते बदलणार आहेत. प्रामुख्याने पवार यांच्या समवेत वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी जाण्याचा निर्णय घेतल्यास येथील भाजपचे प्रमुख इच्छुक शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर यांची उमेदवारीच धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यावर पर्याय म्हणून या दोघांना अन्य ठिकाणी संधी द्यावी लागेल.

हीच अवस्था पर्वती, खडकवासला, कोथरूड येथील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवार समर्थकांची होणार आहे. त्यामुळे खडकवासल्यातून तयारी करणार्‍या सचिन दोडके, पर्वतीमधून अश्विनी कदम आदी इच्छुकांना थेट शरद पवार यांच्या समवेत राहून भाजपच्या विरोधात निवडणुकीत उतरावे लागेल. सध्या तरी यामधील कोणीच आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

महापालिका निवडणुकीतील इच्छुकांचीही हीच अवस्था होणार आहे. भाजपच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी करत असलेल्या अजित पवार समर्थकांना भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारीची संधी मिळणार का हा मोठा पेच निर्माण होईल. त्यामुळे अनेकांना अजित पवारांबरोबर राहण्याची इच्छा असूनही शरद पवारांसमवेत राहावे लागेल. तसेच जे माजी नगरसेवक आता अजित पवार यांच्या समवेत राहतील, त्या जागांवर भाजपला उमेदवार उभा करता येणार नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीत उमेदवारीच्या तिकीट वाटपाचा मोठा पेच उभा राहून अनेकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा

पुणे लोकसभेची जागा भाजपकडे आहे. त्यामुळे आता वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात अजित पवार यांच्या सोबतीचा मोठा फायदा भाजपला होईल. याउलट काँग्रेसची बाजू आणखी कमकुवत होणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news