प्रचार सांगता सभा : देशाच्या भवितव्यासाठी आता वेगळा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार

प्रचार सांगता सभा : देशाच्या भवितव्यासाठी आता वेगळा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : देशामध्ये महागाई, बेरोजगारीसह भ्रष्टाचार व अन्य प्रश्न आहेत. शेतकरी, कामगार, व्यापारी, सर्वसामान्यांचे वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु, सत्ताधार्‍यांकडून त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी आता वेगळा निकाल घ्यावा लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. बारामतीत महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, अनिल देशमुख, फौजिया खान, आमदार अशोक पवार, खा. अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, विकास लवांडे, सक्षणा सलगर, अंकुश काकडे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, भूषणसिंह राजे होळकर, एस. एन. जगताप, संदीप गुजर, सत्यव्रत काळे आदी उपस्थित होते.

देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता असली, तरी आपण बारामतीकर जोपर्यंत एक आहोत तोपर्यंत आपल्याला कोणी काहीच करू शकत नाही. लोकसभेची ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. जनतेचे खूप प्रश्न आहेत. विशेषतः महागाईचा, शेतीचा प्रश्न आहे. ते सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे आगामी काळात देशाला नवी दिशा प्रापत होण्यासाठी राष्ट्रवादी- मविआच्या उमेदवारांना विजयी करा. गेले काही दिवस राज्यातील 18 जिल्ह्यांत फिरलो. या निवडणुकीत तुमचा निर्णय बारामतीकरांच्याच नव्हे, तर देशाच्या हिताचा असेल. तो घेतल्यावर मी पुन्हा तुमच्याशी बोलेन, असेही पवार यांनी सांगितले.

दरवेळी प्रचार सांगता सभा आपण मिशन मैदानावर घेत होतो, परंतु यंदा सत्ताधार्‍यांनी ती जागा मिळू दिली नाही. जागेची अडवणूक केल्याने काही नुकसान होत नाही, हेच आजच्या गर्दीने दाखवून दिल्याचा टोला शरद पवारांनी लगावला. घसा खराब असल्याने त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.  खा. सुळे यांनी या वेळी केंद्र सरकारवर टीका केली. कन्येच्या प्रेमापोटी आंधळे झालेल्यांचा पक्ष, अशी आमची संभावना केली जात आहे. पण, भ्रष्टाचाराच्या आरोपापेक्षा हा आरोप बरा आहे, असे त्या म्हणाल्या. मलाही अरेला का रे करता येईल, पण मी ते करणार नाही, असे त्या म्हणाल्या.

खा. अमोल कोल्हे म्हणाले, त्या राष्ट्रीय अध्यक्षांना बारामतीतून बाहेर पडणे शक्य झाले नाही याचे कारण शरद पवार आहेत. आजच्या सभेने बारामतीकरांच्या मनात काय आहे, हे दाखवून दिले आहे. शरद पवार शेतकर्‍यांचा आत्मा आहेत. चोरीची कोणती गोष्ट टिकत नाही. घड्याळाला कमळाची चावी लागतेय. सभेची जागा काढून घेतली, मात्र बारामतीकरांच्या काळजातील जागा कशी काढणार, अशी टीका त्यांनी केली.

आमदार रोहित पवार झाले भावूक

आमदार पवार यांनी 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत एक व्हिडीओ सुरू करण्याची सूचना केली. या वेळी एका 'व्हिडीओ'वरून त्यांना जुना प्रसंग आठवला. आमदार पवार म्हणाले, मटका कधी फोडला जातो, हे तुम्हाला माहिती आहे. जेव्हा पक्ष फुटला त्या वेळी मी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत होतो. बाहेर पडताना त्यांनी तुम्ही काळजी करू नका, स्वाभिमानी महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. नवीन पिढी जबाबदारी घेईपर्यंत माझे डोळे मिटणार नाहीत, असे सांगितले. ही घटना सांगताना ते कमालीचे भावूक झाले. दोन पारंब्या तुटल्याने वटवृक्षावर परिणाम होत नसल्याचे ते म्हणाले.

आमच्या घरातील महिलांबद्दल बोललात, तर गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. बदललेले अजित पवार आम्हाला मान्य नाहीत, असेही रोहित पवार म्हणाले. शरद पवार यांच्यामुळे सत्ता आली. सत्तेमुळे अनेक नेत्यांना पदे दिली. पदे दिल्यामुळे विकास करता आला. एकट्याने कोणताही विकास केला नसून, अहंकार आणि मीपणा बाजूला करा, असे आवाहन त्यांनी अजित पवार यांना केले. घरातील कोणत्याही सदस्याने शरद पवार यांची जागा घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही ते म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news