धायरी; पुढारी वृत्तसेवा: वडगाव, धायरी परिसरातील ओढ्यात दोन क्रेनच्या साहाय्याने जेसीबी 20 फूट खाली उतरवून केबल दुरुस्तचे काम करण्यात आले आहे. वीज वाहिनीतील दुरुस्तीसाठी महावितरणच्या अधिकार्यांनी ही शक्कल लढविली आहे. महावितरणचे उपविभागीय अधिकारी कल्याण गिरी, सहायक अभियंता सचिन आंबवले, प्रधान तंत्रज्ञ जालिंदर चांदगुडे आदींच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले. महावितरण उपविभाग वडगाव, धायरी या अंतर्गत 22/ 11 के. व्ही. धायरेश्वर उपकेंद्र आहे.
परिसरातील उच्च दाब वाहिनी नुकतीच नादुरुस्त झाली होती. त्यामुळे मनोहर गार्डन, रायकर मळा परिसराती वीजपुरवठा हा खंडित झाला होता. महावितरणने तातडीने या भागाचा विद्युत पुरवठा सावित्री गार्डन वाहिनीला जोडून सुरळीत केला आहे. परंतु, नादुरुस्त वाहिनीची केबल कालव्याच्या कडेला जमिनीमध्ये खोल वीस फूट दाबली गेली होती. हे काम करण्यासाठी महावितरणच्या अधिकार्यांनी दोन क्रेनच्या सहाय्याने जेसीबी ओढ्यात 20 फूट खाली उतरवून केबल दुरुस्तीचे काम केले आहे, यामुळे परिरातील विजेची समस्या सुटली आहे.
कालव्यालगत असलेल्या उच्च दाबाच्या वाहिनीची दुरुस्ती करण्यास त्या ठिकाणी जेसीबीला जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे दोन क्रेनच्या साह्याने जेसीबी ओढ्यात उतरवून या वाहिनीची दुरुस्ती केली आहे.
कल्याण गिरी, उपविभागीय अधिकारी, महावितरण