

पुणे: महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता नवीन गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणी प्रमाणपत्रात प्रकल्पासंबंधी महत्त्वाची माहिती दिली जाईल.
महारेराच्या प्रमाणपत्रातून आणि त्याच्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांतून प्रकल्पाची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना आवश्यक असणारी माहिती लक्षात घेऊन महारेराने हे पाऊल उचलले आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्यात येणार आहे. (Latest Pune News)
महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक म्हणाले, घर खरेदी करण्यासाठी लोक त्यांच्या आयुष्याची जमापुंजी गुंतवतात. त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी प्रयत्नशील आहे. भविष्यात उद्भवणार्या समस्या लक्षात घेऊन, महारेराने प्रकल्पाची कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक तपासणी केल्यानंतरच नोंदणी क्रमांक देण्यास सुरुवात केली आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी येईल. ग्राहकांना मदत करण्यासाठी, महारेराने नोंदणी प्रमाणपत्रावर प्रकल्पाची प्राथमिक माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र, इमारती आणि विंगची नावे तसेच किती मजल्यांपर्यंत बांधकामाची परवानगी आहे, याची माहिती असेल. घर खरेदी करताना ही माहिती काळजीपूर्वक पाहून, कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे.
महारेराच्या नोंदणी प्रमाणपत्रात यापूर्वी प्रमाणपत्रात फक्त प्रकल्पाचे आणि विकासकाचे नाव आणि पत्ता एका ओळीत दिला जायचा. आता ही माहिती बुलेट पॉइंटमध्ये दिली जाईल, ज्यामुळे ती वाचायला सोपी होईल. प्रमाणपत्रासोबत जोडलेल्या कागदपत्रांत प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र, इमारती आणि विंगची संख्या, किती मजले राहण्यासाठी योग्य आहेत, निवासी आणि व्यावसायिक युनिट्सची संख्या, याची माहिती दिली जाईल.