

पुणे : शहरातील हजारो गरीब नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देण्याच्या हेतूने महापालिकेतर्फे अनेक वर्षांपासून चार रुग्णालयांमध्ये ‘मोफत बेड योजना’ राबवली जात आहे. मात्र, योजनेबाबत जनजागृती करण्यात आलेले अपयश आणि रुग्णालयांची उदासीनता यामुळे ही योजना फोल ठरत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून योजनेची माहितीच दिली जात नसल्याने नागरिक सुविधेबाबत अनभिज्ञ आहेत.
महापालिकेने शहरातील चार खासगी रुग्णालयांना अतिरिक्त एफएसआय म्हणजेच बांधकामासाठी 0.5 टक्के अधिक जागा दिली होती. या बदल्यात त्यांनी गरीब रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवण्याचे बंधन घालण्यात आले होते. या योजनेतून राखीव खाटांवरील रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत देण्याची अट होती.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार, या योजनेतून चारही रुग्णालयांमध्ये ठरावीक खाटा राखीव ठेवले जाणे अपेक्षित आहे. मात्र 1 एप्रिल 2024 ते 31 मे 2025 या कालावधीत केवळ 117 रुग्णांनाच या योजनेचा लाभ झाला आहे. महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपचार मोफत दिले जातात. आमच्याकडे आलेल्या कोणत्याही शिफारसपत्रधारक रुग्णाला नकार दिलेला नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रुबी हॉल क्लिनिक : 31 रुग्ण
सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन शाखा: 42 रुग्ण
एम्स हॉस्पिटल, औंध : 14 रुग्ण
इनलॅक्स बुधराणी के.के. आय इन्स्टिट्यूट: 30 रुग्ण
सध्या कोणत्या रुग्णालयात कोणते उपचार?
रुबी हॉल आणि सह्याद्री: फक्त वैद्यकीय व्यवस्थापन सेवा
एम्स, औंध: अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी
केके आय इन्स्टिट्यूट: फक्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया
महापालिकेकडून चार रुग्णालयांमध्ये दिली जाणारी मफ—ी बेडफ सुविधा पूर्ण कार्यक्षमतेने राबवली जात आहे. त्यासाठी गरजू रुग्णांना आरोग्य विभागाकडून पत्रही दिले जाते. अद्याप एकाही रुग्णाने रुग्णालयाकडून सेवा नाकारल्याची तक्रार केलेली नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणे शहरातील रहिवासी असणे आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर आरोग्य विभागाकडून शिफारसपत्र दिले जाते.
डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
नागरिकांना या योजनेबाबत माहिती नाही. आरोग्य विभागाकडून आणि रुग्णालयांकडून याबाबत माहिती दिली जात नसल्याने रुग्ण मोफत उपचारांपासून वंचित राहत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून गरीब व गरजू रुग्णांसाठी 365 दिवस या चारही रुग्णालयांमधील मोफत बेड्स उपलब्ध व्हावेत, यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. या योजनेमध्ये जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ मिळणे आवश्यक आहे.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे