पुणे : लोहगावात भिर्रर्र भिर्रर्र… संत तुकाराम महाराज उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यती

पुणे : लोहगावात भिर्रर्र भिर्रर्र… संत तुकाराम महाराज उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यती

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : संत तुकाराम महाराज यांच्या उत्सवानिमित्त लोहगाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. फळीफोड प्रकारांमध्ये दोन दिवस या शर्यती चालणार आहेत. या शर्यतीमध्ये परिसरातील बैलगाडे मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, गुरुवारी 'भिर्रर्र भिर्रर्र…' या आवाजाने घाट दणाणून गेला होता. संत तुकाराम महाराजांचे आजोळ असणार्‍या लोहगावात महाराजांचा उत्सव गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. उत्सवानिमित्त बैलगाडा, कुस्ती, ढोल-लेझीम पथक यासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरण तळे येथे बैलगाडा शर्यती सुरू आहेत.

संत तुकाराम महाराज उत्सव कमिटीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, प्रथम क्रमांकास 1 लाख 51 हजार रुपये, द्वितीय 1 लाख 41 हजार रुपये, तृतीय 71 हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकास 41 हजार रुपयांच्या रोख बक्षिसांसह चार दुचाकी, दोन चांदीच्या गदा, चार बैलगाडे, चार टीव्ही, चार कुलर अशी भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन गुरुवारी माजी आमदार रामभाऊ मोझे, जगदीश मुळीक, प्रशांत जगताप, पांडुरंग खेसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शनिवारी (दि. 18) शर्यतीचा दुसरा दिवस असून, सायंकाळी बक्षीस वितरण आमदार सुनील टिंगरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news