

बारामती : बैल विक्री व्यवहारातून झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या फलटनच्या रणजीत निंबाळकर यांचा शनिवारी (दि. २९) पहाटे उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे आता काकडे कुटुंबावर खुनाचा गुन्हा दाखल होईल.
बैल व्यवहारातून रणजीत निंबाळकर आणि काकडे यांच्यामध्ये गुरुवारी रात्री खटका उडला होता. काकडे व निंबाळकर यांच्यामध्ये व्यवहारातील राहिलेल्या पैशातून वादविवाद चालू होते. दोन दिवसापूर्वी रणजीत निंबाळकर यांना काकडे कुटुंबीयांनी व्यवहार मिटवण्यासाठी स्वतःच्या घरी बोलावून घेतलं होतं. गौतम काकडे गौरव काकडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रणजीत निंबाळकर आणि त्याच्याबरोबर आलेल्या लोकांवर हल्ला चढवला होता. त्यातच पिस्तुलातून काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. यामध्ये निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना पुण्याला हलवण्यात आले; मात्र पहाटे रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
काकडे कुटुंब आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आता खुनाचा गुन्हा दाखल होईल. या प्रकरणात सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे व त्यांचा मुलगा गौरव हे दोघे अटकेत आहेत.दरम्यान रणजीत निंबाळकर हे क्रीडा क्षेत्रातील तसेच शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व असल्यामुळे फलटण व सातारा जिल्ह्यात त्यांचा दांडगा लोकसंपर्क होता. त्यामुळे फलटण तालुक्यातही रणजीत निंबाळकर यांच्या खूनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.