Crime news : वेश्याव्यवसाय रॅकेट उद्ध्वस्त

Crime news : वेश्याव्यवसाय रॅकेट उद्ध्वस्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बालेवाडी परिसरात तीन हॉटेलमध्ये छापेमारी करत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नवी मुंबई आणि इतर परराज्यातील तब्बल 11 मुलींची सुटका केली आहे. तर याप्रकरणी पाच दलालांवर गुन्हे दाखल केले आहे. रॉकी कदम, राहुल ऊर्फ मदन संन्यासी, दिनेश ऊर्फ मामा, नदिम आणि रोशन यांच्यावर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात कलम 370, 34 व अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील महिला पोलिस कर्मचार्‍याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत शहरातील ऑनलाइन वेश्या व्यवसायासंदर्भात तक्रारी वाढल्या होत्या. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालविला जात आहे. गुप्त बातमीदारामार्फत बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस हवालदार तुषार भिवरकर, पोलिस नाईक अमेय रसाळ यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांना कळविले. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केली असता, एजंटच्या माध्यमातून फोन कॉलद्वारे हॉटेल आणि सदनिकामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचेसमोर आले.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने सापळा रचून येथील एका महाविद्यालयजवळील हॉटेल टॅग हाऊस येथे छापा टाकला. तिथे तीन मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अशाच प्रकारे पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील स्नेह अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तेथून ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, काही मुली एजंटच्या सांगण्यावरून लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करत आहेत. यानंतर भरत जाधव यांच्या पथकाने लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलमध्ये छापा टाकला. यावेळी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आठ मुली मिळून आल्या.

यामध्ये दिल्ली राज्यातील गुडगाव आणि नजबगड, उत्तर प्रदेशातील आझमगड, पश्चिम बंगालमधील कोलकत्ता व काशिपूर, आसामधील लिखापानी, महाराष्ट्रातील नवी मुंबई, अंधेरी व वाशी, गुजरात वापी आणि मध्य प्रदेशातील इंदोर येथील या मुलींची सुटका करण्यात आली. या मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी भोसले, पोलिस कर्मचारी सागर केकाण, मनीषा पुकाळे, अजय राणे, तुषार भिवरकर, इम—ान नदाफ यांच्या पथकाने केली.

logo
Pudhari News
pudhari.news