खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरण खोर्यातील बहुली ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए ) रस्त्यावरील कुडजेजवळील पिकॉबे पुलाचे काम लालफितीत अडकले आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण न झाल्यास खडकवासला धरण खोर्यातील सांगरूण, बाहुली मांडवी आदींसह 23 गावांचा संपर्क तुटण्याची टांगती तलवार उभी आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने लालफितीत अडकलेल्या प्रशासकीय अडचणी दूर केल्या आहेत. पुलाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळ्यात ओढ्याला पूर येत असल्याने पुलाअभावी रस्त्यावरील वाहतूक बंद पडण्याचा धोका आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लष्कराच्या पुण्यातील कार्यालयात धाव घेतली.
कुडजेजवळ एनडीएच्या हद्दीतील पिकॉबे येथे 12 मीटर लांबीच्या प्रशस्त पुलाच्या उभारणीसाठी दोन महिन्यांपूर्वी जुना पूल जमीनदोस्त करण्यात आला. खोदकाम करून बाजूने तात्पुरता कच्चा रस्ता तयार करण्यात आला. मात्र, या पुलाचे काम सुरू होताच एनडीए प्रशासनाने हरकत घेतली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पुलाचे काम सुरू झाले नाही. खडकवासला धरण खोर्यासह डावजे निळकंठेश्वर, मुठा खोरे, टेमघर धरण परिसर पुण्याला जवळच्या अंतराने जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. अलीकडच्या काळात या मार्गावर पर्यटक, भाविकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण, तसेच ओढे, नाल्यांवर पाच ठिकाणी 12 मीटर लांबीचे प्रशस्त पूल उभारण्यात येत आहेत.
भारतीय लष्कराच्या मालमत्ता विभागाने पुलाच्या कामासाठी नाहरकत पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच एनडीए प्रशासनाकडून आता मंजुरी देण्यात येणार आहे. एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
-एन. एम. रणसिंग, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग
हेही वाचा