धारावीत लाखो रुपयांच्या एमडीसह तस्कराला अटक | पुढारी

धारावीत लाखो रुपयांच्या एमडीसह तस्कराला अटक

धारावी : पुढारी वृत्तसेवा : धारावी मुकुंदनगर परिसरात मेफॅड्रॉन (एमडी)ची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला मंगळवारी धारावी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. मोहम्मद नावेद जावेद खान (23) असे आरोपी तस्कराचे नाव असून तो प्रियदर्शनी सोसायटी, डांबर कंपाऊंड, मुकुंदनगरमधील रहिवासी आहे.

धारावी पोलीस ठाण्याचे पोह. अंगरक यांना धारावीतील डांबर कंपाऊंड परिसरात एक तरुण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाली होती. माहिती मिळताच पोह अंगरक, पोशि साळुंखे, भरगुडे यांनी डांबर कंपाऊंड परिसर गाठून तस्कराचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी एक तरुण पोलिसांना पाहून पळून जात असल्याचे पाहून पोलिसांनी पाठलाग करून त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ सापडला.

लागलीच पोलिसांनी रात्रपाळी पार्वेक्षक मपोनि वैशाली चव्हाण, सपोनि वैभव कदम यांना घटनेची माहिती देत तरुणाला धारावी पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.

धारावी पोलिसांनी आरोपी तस्कराच्या ताब्यातून 31 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केला असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 6 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी त्याच्यावर एनडीपीएससह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button