पुणे : डीपीचा शॉक लागल्याने मुलगा गंभीर जखमी

पुणे : डीपीचा शॉक लागल्याने मुलगा गंभीर जखमी

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : वडगाव शेरी येथील आनंद पार्क बसस्टॉपशेजारी असलेल्या डीपीतून विजेचा शॉक लागल्याने अंकुर बनसोड (वय 15) हा मुलगा गंभीर जखमी झाला. नागरिकांनी या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे परिसरात आतापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर विजेचा शॉक बसून अंकुर गंभीर जखमी झाला. महावितरणने या डीपीभोवती संरक्षण जाळ्या बसविणे गरजेचे आहे. तसेच डीपी व केबलची वेळोवेळी तपासणी करावी, अशी नागरिकांकडून वारंवार मागणी होते.

मात्र, महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ते नागरिकांच्या जिवावर बेतू लागले आहे. प्रत्यक्षदर्शी राहुल दळवी, प्रकाश धोत्रे आणि अ‍ॅड. सतीश माने यांनी सांगितले की, आम्ही कार्यालयात असताना जवळच मोठा आवाज झाला. त्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला होता. आम्ही बाहेर येऊन पाहिले असता मुलाला डीपीतून विजेचा शॉक बसल्याचे दिसून आले. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

डीपीजवळ असलेल्या जाळीतून हा मुलगा आत गेला. त्यानंतर त्याला विजेचा शॉक बसला. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
– कैलास कांबळे, अधिकारी, महावितरण

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news