

लोणी धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त लोणी-धामणी परिसरात विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. तर नदी, ओढे, नाले, पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच पुढील काळात शेतीसाठी सिंचन व्यवस्था व्हावी म्हणून अनेक शेतकर्यांनी नवीन विहिरी खोदणे, विहिरींची खोली वाढविणे, पाईपलाईन करणे तसेच कूपनलिका घेण्यास सुरुवात केली आहे.
जानेवारीनंतर विहिरी खोदल्या जातात. कारण पावसाळा संपल्यानंतरच्या जानेवारी महिन्यात पाण्याची पातळी ही फार खोल गेलेली नसते आणि ती उथळही नसते. पावसाळ्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये भूगर्भात पाणी मुरण्याची प्रक्रिया थांबलेली असते. पण, या प्रक्रियेमुळे भूगर्भ खोदण्यासाठीची क्रिया ही सोपी असते. कारण जमीनही नरम झालेली असते.
त्यामुळे या महिन्यात विहिरीचे खोदकाम सुरू केले तर मार्च-एप्रिलपर्यंत खोदकाम करण्यास सोपे जाते. यासाठी शेतकरी पाणाड्यांच्या मदतीने मुहूर्त ठरवून विहिरींचे खोदकाम करतात. सध्या वाढत्या उष्णतेने आंबेगाव तालुक्याच्या लोणी धामणी परिसरातदेखील पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी आपल्या शेतात विहीर खोदकाम किंवा खोलीकरण तसेच कूपनलिका घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या या परिसरात कूपनलिका घेण्याबरोबरच पाईपलाईन करण्याची कामेही जोरात सुरू आहेत.
धामणीच्या जाधवमळ्यातील रवींद्र बढेकर व केरभाऊ बढेकर यांनी सांगितले की, आमची एक विहीर 38 ते 39 फूट खोल आहे. या विहिरीत पाणीसाठा पुरेसा होत नव्हता. मात्र, आता आम्ही विहीर 15 फूट खोल खोदणार आहोत. अखेरीस ही विहीर 53 ते 54 फूट खोल होईल. त्यामुळे भविष्यात पाण्याचा साठा वाढणार आहे. खोलीकरणाचे काम क्रेनच्या साह्याने सुभाष पवार (तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांच्यासह कामगारांमार्फत केले जात आहे.