व्हिक्टोरिया तलावाने गाठला तळ; औद्योगिक वसाहतीवर पाणीटंचाईचे संकट

व्हिक्टोरिया तलावाने गाठला तळ; औद्योगिक वसाहतीवर पाणीटंचाईचे संकट
Published on
Updated on

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीवर पाणीटंचाईचे संकट; कंपन्यांना पाणी जपून वापरण्याचे आदेश

खोर : पुढारी वृत्तसेवा : येथील ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया तलावात अवघा 7 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने दौंड तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीटंचाई भेडसावत आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कुरकुंभ एमआयडीसीतील सर्व कंपन्यांना वरवंड जलाशयात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिला नसल्याने पाणी जपून वापरण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

कुरकुंभ व पांढरेवाडी ग्रामपंचायतीला पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने 10 ते 12 दिवसांत वरवंडच्या तलावात खडकवासला धरणसाखळीतून पाणी येण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. व्हिक्टोरिया तलावावर दौंड तालुक्यातील कुसेगाव, पडवी, खोर, नारायणबेट, देऊळगावगाडा, वरवंड, कडेठाण, कानगाव, गिरीम आणि पाटस हद्दीतील तसेच पूर्वेकडील गावांना सध्या पाण्याच्या टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

पाणीटंचाईचे संकट गडद

या तलावातून दौंड तालुक्यातील आठ गावांना पाणीपुरवठा केला जातो. कुरकुंभ औद्योगिक वसाहत, वायनरी प्रकल्प, बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई योजनेलाही याच तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सद्य:स्थितीला अपुरा पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे.

सध्या वरवंड तलावातील पाणीपातळी खालावल्याने ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. खडकवासला धरणसाखळीतून आवर्तन येईपर्यंत या गावांनी व कुरकुंभ औद्योगिक वसाहतीने पाणी काटकसरीने वापरावे. अजून खडकवासलाचे पाणी इंदापूरला पोहचले नाही. टेल टू हेड पाणी मिळत असल्याने वरवंड तलाव भरण्याची तारीख अजूनतरी निश्चित नाही.

– राहुल वर्‍हाडे, शाखा अधिकारी, खडकवासला जलसंपदा विभाग, वरवंड

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news