

पुणे: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील घटनास्थळ पंचांची साक्ष सोमवारी (दि.१३) विशेष सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांच्या न्यायालयात नोंदविण्यात आली. बलात्कार करण्यापूर्वी तीनही आरोपी दुचाकीवरून बोपदेव घाटात कसे आले, त्यांनी मद्यपान व गांजा सेवन केलेली जागा, टेबल पॉइंटपासून पायवाटेने दरीत उतरल्यानंतर झाडापाशी सामूहिक बलात्कार केल्याचे ठिकाण, त्यानंतर कोणत्या रस्त्याने पसार झाले, या सर्व जागा पंचनाम्यादरम्यान दाखविल्या असल्याची साक्ष पंचाने न्यायालयात नोंदविली. या जागांच्या पंचनाम्याचे चित्रीकरणही न्यायालयात सादर करण्यात आले.
बोपदेव घाटात मित्रासमवेत फिरायला गेलेली तरुणी व तिच्या मित्राला तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना तीन ऑक्टोबर २०२४ रोजी घडली. पुण्यासह देशभरात खळबळ उडवून दिलेल्या या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख (वय २७, रा. आदर्शनगर, मंतरवाडी), चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०, रा. होलेवस्ती, उंड्री) आणि बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावी (वय ३३, रा. दीपनगर, काटेवाडी, ता. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून, पाचशे पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.
तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७० (१) (सामूहिक बलात्कार), १२६ (२) (बळजबरीने डांबून ठेवणे), ११५ (२) (इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे), ३०९ (६) (जबरी चोरी), ३५२ (अपमान करणे), ३५१ (२) व (३) (धमकावणे) यांसह शस्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत.
तीनही आरोपींविरोधात आरोपनिश्चिती झाली असून, खटल्याच्या सुनावणीला वेग आला आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी एकूण पंचवीस साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली आहे.
मागील सुनावणीवेळी पीडित तरुणी व तिच्या मित्राची साक्ष नोंदविली असून, दोघांनीही आरोपींना न्यायालयात ओळखले. आरोपींनी पीडित व तिच्या मित्राला लाकडी बांबूने मारहाण केली होती. हा बांबू पंचांसमक्ष हस्तगत केला आहे. आरोपी शोएब अख्तर आणि चंद्रकुमार कनोजिया याने गुन्ह्याचे घटनास्थळ, बोपदेव घाटात कसे आले आणि गुन्हा केल्यानंतर कोणत्या मार्गाने पळून गेले, या सर्व जागा पंचनाम्यादरम्यान दाखविल्या. बचाव पक्षातर्फे मुख्य लोक अभिरक्षक कार्यालयाचे प्रमुख ॲड. करीम जीवनी यांनी साक्षीदारांची उलटतपासणी नोंदवली. या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी होणार आहे.