शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके..!

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच 2024-25 या वर्षासाठी बालभारतीकडून प्रकाशित करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप येत्या बुधवार (दि.15)पासून केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील एकूण 4 लाख 32 हजार 617 विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार आहेत. येत्या 30 मेपर्यंत पुणे जिल्ह्यातील एकूण 5 हजार 353 शाळांमध्ये ही पुस्तके पोहोच करणे अपेक्षित आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

बालभारतीच्या माध्यमातून दरवर्षी शासकीय व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. बालभारतीकडून सुमारे नऊ कोटी पुस्तकांची छपाई केली जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्याचे नियोजन दरवर्षी शिक्षण विभागाकडून केले जाते. त्यानुसार यंदा 15 मे पासून पुणे जिल्ह्यातील शाळांना पाठ्यपुस्तके पोहोच करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांसाठी जिल्हास्तरावरून पहिली ते आठवीसाठी एकूण 5 माध्यमांची पुस्तके वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, तेलुगू या भाषांचा समावेश असणार आहे. पहिली ते आठवीसाठी एकूण 4 लाख 32 हजार 617 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 3 हजार 638 शाळा, नगरपालिकेच्या 67, तसेच 1 हजार 648 अनुदानित व अंशत: अनुदानित अशा 5 हजार 353 शाळांमध्ये ही पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news