ज्येष्ठांची उतारवयातील साथीदार बनली पुस्तके

ज्येष्ठांची उतारवयातील साथीदार बनली पुस्तके

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ज्येष्ठ नागरिकांसाठीही छापील पुस्तके उतारवयातील साथीदार बनली आहेत. काहीजण ग्रंथालयांमध्ये जाऊन, तर कोणी दालनांमधून पुस्तके घेऊन वाचन करीत आहे. 55 ते 85 वयोगटांतील ज्येष्ठ विविध विषयांवरील पुस्तके वाचत असून, काहीजण तर ई-बुकच्या वाचनासह ऑडिओ बुक्सही ऐकत आहेत. छापील पुस्तकांच्या वाचकसंख्येत 30 ते 40 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.

उतारवयात करमणुकीसाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक रोज तीन ते चार तास विविध विषयांवरील पुस्तके वाचत असून, रहस्यात्मक कथा, आत्मचरित्रे, ज्येष्ठांच्या आयुष्याशी निगडित पुस्तके, आरोग्यावरील पुस्तके, पाककला, संगीत, नृत्यावर आधारित पुस्तक, कवितासंग्रह, बँकिंगशी निगडित पुस्तके आदी विषयांवरील पुस्तकांचे वाचन ज्येष्ठ नागरिक करीत असून, ग्रंथालयातील वाचकांच्या सदस्य संख्येत 20 ते 30 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. रविवारी (दि. 23) साजरा होणार्‍या जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुढारीने याबाबत जाणून घेतले. मृत्युंजय, ययाती, मुसाफिर, दुनियादारी, पानिपत आदी पुस्तके ज्येष्ठ वाचत आहेत. पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे म्हणाले, कोरोना काळात आम्ही घरपोच पुस्तक योजना सुरू केली होती. आताही ही योजना सुरू आहे, त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना घरपोच पुस्तक पोचविली जात असून, त्याशिवाय काही ज्येष्ठ ग्रंथालयात येऊन पुस्तके वाचत असून, त्यात 55 वर्षांपुढील ज्येष्ठांचा समावेश आहे.

पुस्तकांमध्येही आता क्यूआर कोड
काळाप्रमाणे बदलत आता पुस्तकांमध्येही क्यूआर कोड स्कॅनर दिले जात असून, ते स्कॅन केल्यानंतर पुस्तकाविषयीची संपूर्ण माहिती असो वा पुस्तकाचा टिझर वाचकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुस्तकाविषयीची अधिक माहिती वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रकाशक त्याचा वापर करीत आहेत. याबाबत मेहता पब्लिशिंग हाऊसचे अखिल मेहता म्हणाले, आम्ही वाचकांना ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून वाचकांना पुस्तकाविषयीची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ पाहायला मिळावीत. आता काही पुस्तकांमध्ये ही सुविधा उपलब्ध
केली आहे.

ग्रंथालयातील सदस्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. ग्रंथालयात येऊन पुस्तक घरी नेऊन वाचण्यावर अनेकांचा भर आहे. उतारवयात पुस्तके ज्येष्ठांसाठी साथीदार बनली असून, आम्हीही ज्येष्ठांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुस्तके देतो. –                                             मधुमिलिंद मेहेंदळे, अध्यक्ष, पुणे नगर वाचन मंदिर

उतारवयातील साथीदार म्हणजे पुस्तकं. मी रोज दोन ते अडीच तास पुस्तकांचे वाचन करतो आणि वेगळेच समाधान मिळते, ज्ञान वाढते. ग्रंथालयातून पुस्तक आणून मी वाचतो. त्यातून खूप काही जाणता येते,
शिकायला मिळते.

                                                     – श्रीराम बेडकीहाळ, ज्येष्ठ नागरिक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news