पुणे : सीबीएसई शाळांना बोगस एनओसी; चौकशी होणार

पुणे : सीबीएसई शाळांना बोगस एनओसी; चौकशी होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सीबीएसई बोर्डाच्या काही शाळांनी शासनाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र मिळवले असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असून, पुढील काही दिवसात सीबीएसई बोर्डाची मान्यता मिळवलेल्या सर्वच शाळांची कसून चौकशी करण्याचे आदेश उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात येणार आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील सीबीएसई बोर्डाच्या काही शाळांना शासनाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र काहीजण मिळवून देत असल्याचे समोर आले.

शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना आपल्या परिसरातील बनावट ना हरकत प्रमाणपत्र घेणार्‍या सीबीएसई शाळांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. उपसंचालकांकडून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकार्‍यांना बनावट ना हरकत प्रमाणपत्र मिळवणार्‍या शाळांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकार्‍यांनी याबाबत चौकशी केली; त्यामध्ये त्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या शाळांव्यतिरिक्त आणखी काही शाळांनी बनावट प्रमाणपत्र मिळवण्याचे उघड झाले. शाळांनी यामधील व्यक्तींना काही रक्कम दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात अनधिकृत शाळा चालवल्या जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित शाळा बंद करण्याची कार्यवाही
शिक्षण विभागाकडून सुरू झाली आहे. त्यात आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेल्या शाळांची भर पडणार आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

संबंधित तीन राज्य मंडळांच्या शाळांनी सीबीएसई बोर्डाची मान्यता असल्याचे दर्शविले होते. परंतु, संबंधित शाळांकडे सीबीएसई बोर्डाची मान्यता नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रिय अधिकार्‍यांना पत्र देणार असून, सीबीएसई बोर्डाची मान्यता असलेल्या सर्वच शाळांची चौकशी करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

                                                                – औदुंबर उकिरडे,
                                                    शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news