

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : रक्ताचा कर्करोग हा मुलांसाठी घातक ठरत आहे. एकूण कर्करुग्णांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये होणार्या कर्करोगाचे प्रमाण हे 3 टक्के इतके आहे. बालकांमध्ये ल्युकेमिया आणि लाइमफोमा हे रक्ताच्या कर्करोगाचे आजार सध्या बळावत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. या आजाराबाबत वेळीच काळजी घेतल्यास जवळपास 70 टक्के बालकांचा हा आजार कायमस्वरुपी बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
15 वर्षाच्या आतील मुलांमध्ये कर्करोग
रक्ताच्या कर्करोगाला जनुकामधील दोष आणि पर्यावरणातील प्रतिकूल घटक कारणीभूत ठरत असल्याचे साधारणपणे मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत 15 वर्षाच्या आतील मुलांमध्येदेखील कर्करोगाचे निदान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आढळून येणारा कर्करोग नेमका कोणत्या कारणांमुळे होतो, याचा अभ्यास सध्या सुरु आहे. लहान मुलांना मेंदुचा, डोळ्यांचा, किडनीचा, यकृताचा, हाडांचा अशा प्रकारचे कर्करोगही होऊ शकतात. शस्त्रक्रिया, केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार त्यावर केले जातात.
प्रमुख लक्षणे
सतत ताप येणे, शरीरात एखादी गाठी जास्त दिवस राहणे, लाल डाग येणे, पोट फुगणे, रक्तस्राव होणे या प्रकारची प्राथमिक लक्षणे दिसतात. वारंवार ताप येत असेल आणि अन्य काही लक्षणेही जाणवत असल्यास पालकांनी घाबरुन न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांवर उपचार करून घ्यायला हवे.
लहान मुलांचा कर्करोग बरा होण्याचे प्रमाण हे सरासरी 70 टक्के आहे. त्यांच्यातील काही कर्करोग बरे होण्याचे प्रमाण हे 90 टक्क्यांपर्यंतही आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास तो कायमस्वरुपी बरा होऊ शकतो. पालकांनी मुलांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करायला हवे.
– डॉ. शैलेश कानविंदे, बाल कर्करोग तज्ज्ञ.