

blade attack in budhwar peth pune
पुणे: पळून जाणार्या एकाला पकडत असताना त्याने ब्लेडने भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याच्या चेहर्यावर वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या वेळी हल्ल्यात तरुणाच्या चेहर्यावर अकरा टाके पडले आहे. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार बुधवार पेठेतील आझाद मित्रमंडळ चौक येथे 6 ऑगस्ट रोजी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत रोहित कृष्णा चव्हाण (25, रा. ओम शंकर अपार्टमेंट, देवाजी बाबा मंदिरासमोर, रविवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार यांचा इलेक्ट्रिक सर्व्हिसेसचा व्यावसाय आहे. तसेच ते भाऊसाहेब रंगारी मंडळाचे कार्यकर्ता म्हणूनदेखील काम करतात. दि. 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते भाऊसाहेब रंगारी मंडळ येथे आरतीसाठी आले होते. आरती संपल्यानंतर आठ ते नऊ जण मिळून सुप्रीम सँडवीच येथे नाष्टा करण्यासाठी गेले होते.
तेथून पुन्हा भाऊसाहेब रंगारी मंडळाकडे येत असताना सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास एक माणूस व त्यांच्यामागे तक्रारदारांच्या मंडळाचे कार्यकर्ते पळत येत असताना दिसले. त्या वेळी तक्रारदाराने त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्या हातातील ब्लेडने रोहित यांच्या चेहर्यावर वार केले. आरोपीने डाव्या डोळ्यापासून ओठापर्यंत ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या रोहित यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.