

पुणे: महापालिका आयुक्तांच्या बैठकीदरम्यान मनसे पदाधिकार्यांनी केलेल्या राड्याचे पडसाद सुरक्षारक्षकांवर उमटले आहेत. आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा ठपका ठेवत महापालिकेच्या दोन कायमस्वरूपी आणि तीन कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका उपायुक्त संदीप खलाटे यांनी जारी केले.
स्वच्छतेच्या विषयावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम अधिकार्यांसमवेत बैठक घेत असताना मनसेचे पदाधिकारी माजी नगरसेवक अॅड. किशोर शिंदे, संजय भोसले, तांबोळी यांच्यासह आणखी एक कार्यकर्ता थेट मीटिंग रूममध्ये घुसले.
या वेळी आयुक्त आणि मनसे पदाधिकार्यांमध्ये तीव्र वाद झाले. त्यानंतर आयुक्त कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केले, तर मनसे व महाविकास आघाडीने देखील आंदोलन करून या घटनेचा निषेध केला.
मात्र, या प्रकरणाचा परिणाम थेट सुरक्षाव्यवस्थेवर झाला. आयुक्त कार्यालयातील बैठकीमध्ये विनापरवानगी घुसखोरी झाल्याने सुरक्षा यंत्रणेतील कसूर मानून त्या दिवशी ड्युटीवर असलेले पाच सुरक्षारक्षक, त्यात दोन महापालिकेचे कायम रक्षक आणि ‘ईगल सिक्युरिटी अँड पर्सोनलसर्व्हिसेस’ या कंत्राटी कंपनीचे तीन रक्षकाची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.