पुणे : घरगुती गॅसचा काळाबाजार करणारे गजाआड

पुणे : घरगुती गॅसचा काळाबाजार करणारे गजाआड

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधील गॅस धोकादायकरीत्या काढून तो व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरून त्याची अवैधरीत्या जादा दराने विक्री करणार्‍या दोघांना राजगड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गजाआड केले. या कारवाईत वेगवेगळ्या कंपनीचे सुमारे 60 सिलिंडरसह 1 लाख 71 हजार 500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. खेड-शिवापूर टोलनाका परिसरात बुधवारी (दि. 19) ही कारवाई करण्यात आली. लक्ष्मण अर्जुन गोडसे (वय 29) व प्रवीण रेवणसिद्ध शेळके (वय 31, दोघे रा. चरवडवस्ती, वडगाव बुद्रुक, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

खेड-शिवापूर टोलनाक्यालगत खासगी कंपनीच्या बाजूला गोडाऊनमध्ये काही लोक घरगुती वापरातील गॅस सिलिंडरमधील गॅस धोकादायकपणे काढून तो व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये भरत होते. तसेच त्याची जादा दराने विक्री करत असल्याची माहिती राजगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी छापा मारला. यावेळी दोघांना अटक करून वेगवेगळ्या कंपनीचे सुमारे 60 सिलिंडरसह 1 लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपअधीक्षक धनंजय पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलिस नाईक अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, मंगेश भगत यांच्या पथकाने ही कामगिरी केली. राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news