नायगाव : मावडी कडेपठारला रेशनिंग धान्याचा काळाबाजार

नायगाव : मावडी कडेपठारला रेशनिंग धान्याचा काळाबाजार

नायगाव (ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : मावडी कडेपठार येथील रेशनिंग दुकानातील धान्याची दुकानदाराने परस्पर विक्री केल्याची बाब समोर आली आहे. एका सुजाण नागरिकाने सदर बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यास दुकानदाराने मारहाण केली.
जालिंदर गायकवाड हे 3 फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घरी जात असताना त्यांना रेशनिंग दुकानासमोर पिकअप गाडीत कोणीतरी धान्य भरत असल्याचे दिसले. त्यांनी खातरजमा केली असता मावडी कडेपठारचे व लगतच्या गावचे रेशनिंग दुकानदारच रेशनिंगचे धान्य गाडीत भरत असल्याचे दिसले. सदर गाडी जालिंदर गायकवाड यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर चालक गाडी घेऊन पसार झाला.

ग्रामस्थांनी मंडलाधिकारी गोपाळ लाखे यांना रात्री बारादरम्यान बोलवून घेत याबाबत माहिती दिली. लाखे यांनी धान्याची चौकशी केली असता धान्याची पोती कमी असल्याचे निदर्शनास आले. लाखे यांनी दुकानदारांकडे रजिस्टरची मागणी केली असता एक रजिस्टर मिळाले व दुसरे रजिस्टर जवळार्जून गावच्या रेशनिंग दुकानात आहे, असे सांगण्यात आले. लाखे हे धान्याची चौकशी करीत असतानाच त्यांच्या समोर दुकानदार राजेंद्र गायकवाड यांनी मारहाण केल्याचे जालिंदर गायकवाड यांनी सांगितले.

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जालिंदर गायकवाड यांनी केली आहे. या संदभार्त रेशनिंग दुकानदार राजेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. मावडी कडेपठार येथील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित रेशनिंग दुकानात दप्तर तपासणी केली असता दहा क्विंटलपेक्षा अधिक धान्य कमी असल्याचे आढळले. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पुरंदरचे पुरवठा अधिकारी सुधीर बडदे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news